गोव्यातील मद्य व्यावसायिक गुजरामध्ये वॉन्टेड; अटकपूर्व जामीन फेटाळला
By वासुदेव.पागी | Updated: October 15, 2023 18:59 IST2023-10-15T18:58:34+5:302023-10-15T18:59:10+5:30
काणकोण येथील मद्य व्यापारी लिगोरियो डिसोझा हा मद्य तस्करी प्रकरणात गुजरात पोलीसांना हवा असून त्याच्या विरुद्ध गुजरात पोलिसांनी तस्करीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गोव्यातील मद्य व्यावसायिक गुजरामध्ये वॉन्टेड; अटकपूर्व जामीन फेटाळला
पणजी : काणकोण येथील मद्य व्यापारी लिगोरियो डिसोझा हा मद्य तस्करी प्रकरणात गुजरात पोलीसांना हवा असून त्याच्या विरुद्ध गुजरात पोलिसांनी तस्करीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याने जामीनसाठी केलेला अर्जही गुजरातमधील भचाऊ अतिरिक्त आणि सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. अलिकडेच गुजरात पोलिसांनी अंतरराज्य मद्य तस्कर रेकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणाचा तपास करीत असताना त्यांना या तस्करीचे गोव्यातील काही मद्य व्यावसायिकांशी धागेदोरे सापडले. गोव्यातून गुजराला दारुची तस्करी होत होती.
या तस्करीत लिगोरियो असल्याचा संशय गुजरात पोलिसांना आहे. तसे पुरावेही सापडल्याचा गुजरात पोलिसाचा दावा आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर अटक चुकविण्यासाठी लिगोरियो याने गुजरातमधील भचाऊ अतिरिक्त न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता. परंतु त्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळल्यामुळे गुजरात पोलीस त्याला केव्हाही अटक करून गुजरातला नेऊ शकतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुजरातमधून गोव्यात पोलीस पथकेही दाखल होणार आहेत. लिगोरियो व्यतिरिक्त अनिल मारुती तरडे, हितेंद्रसिंह जोरुभा वाघेला, दीपेश पुंजाभाई पटानी आणि आणखी एका व्यक्तीसह चार जणांवर गुजरात पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.