आधारकार्ड लिंक करा, अन्यथा 'दयानंद'चे पैसे नाहीत! अर्जाची छाननी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 08:29 IST2025-03-14T08:28:49+5:302025-03-14T08:29:52+5:30
मंत्री सुभाष फळदेसाई यांचा इशारा

आधारकार्ड लिंक करा, अन्यथा 'दयानंद'चे पैसे नाहीत! अर्जाची छाननी सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: दयानंद सामाजिक सुरक्षा योजना (डीडीएस) अंतर्गत समाजकल्याण खात्याकडे असलेल्या सर्व अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू झाली आहे. छाननी दरम्यान असे लक्षात आले आहे की, अनेक लाभार्थ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्यात आलेले नाही. त्यामुळे आता लाभार्थ्यांनी त्वरित आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावे, अन्यथा खात्यात पैसे जमा होण्यास अडथळे निर्माण होणार आहेत, अशी माहिती समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.
लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी ३० एप्रिल २०२५ पूर्वी लिंक करणे गरजेचे आहे. याबाबत मुदतवाढ तवाढ देखील दिली जाणार नाही. केवळ दयानंद सामाजिक सुरक्षा योजनाच नाही तर समाजकल्याण खात्याच्या इतर योजनांचा लाभघेण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. त्यामुळे लोकांनी त्वरित आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करावे. अन्यथा योजनांचे पैसे मिळणे कठीण होईल, असेही मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.
३० कोटी वसूल
गेल्या दोन वर्षांपासून आम्ही कडकपणे अर्जाची छाननी करत आहोत. अनेकदा आमच्या लक्षात आले की लाभार्थ्यांचे मृत्यू होऊनही अनेक वर्षे त्यांच्या खात्यात पैसे गेले आहेत. तसेच लाभार्थी देशाबाहेर किंवा ही २ त्यांना पैसे जात आहेत, असे अनेक अर्ज रद्द केले आहेत. आतापर्यंत सुमारे ६००० अर्ज रद्द करण्यात आले असून अजूनही काही अर्ज रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. यातून सुमारे ३० कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
दयानंद सामाजिक सुरक्षा योजना योग्य पद्धतीने सुरू राहावी. तसेच बोगस लाभार्थी यातून वगळे जावेत. यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आधार कार्ड बैंक खात्याला लिंक केल्यास अशा बेकायदेशीर गोष्टींना आळा बसणार आहे. या गोष्टी करून घेण्यास आमच्या कर्मचाऱ्यांना देखील आम्ही कामाला लावले आहे. - सुभाष फळदेसाई, समाजकल्याण मंत्री