कौशल्यपूरक पिढी घडवूया: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; भारती ठाकूर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2025 09:19 IST2025-01-06T09:15:28+5:302025-01-06T09:19:01+5:30

चतुरंग प्रतिष्ठानतर्फे आयोजित ३३ व्या रंग संमेलन व जीवनगौरव पुरस्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

let create a skilled generation said cm pramod sawant | कौशल्यपूरक पिढी घडवूया: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; भारती ठाकूर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

कौशल्यपूरक पिढी घडवूया: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; भारती ठाकूर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : 'कौशल्य विकास पूरक शिक्षणपद्धती लुप्त होत असतानाच, २०१४ पासून कौशल्य विकास मंत्रालयाच्या माध्यमातून यावर भर दिला जात आहे. त्या माध्यमातून कौशल्य पूरक सशक्त पिढी घडवण्याचे काम चालू आहे. नर्मदालयाच्या संस्थापिका भारती ठाकूर यांच्यासारख्या अनेक लोकांच्या प्रेरणेतून सरकार यासंदर्भात ठोस कार्यक्रम राबवत आहे. प्रात्यक्षिक व प्रायोगिक कामाच्या माध्यमातून युवकांनी नवे जग उभे करण्याची हीच वेळ आहे' असे उद्‌गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

चतुरंग प्रतिष्ठानतर्फे आयोजित ३३ व्या रंग संमेलन व जीवनगौरव पुरस्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथराव माशेलकर, जीवनगौरव पुरस्कार प्राप्त भारती ठाकूर, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष श्रीनिवास धेपे, निवड पुरस्कार समितीचे विनय सहस्त्रबुद्धे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, समाज उभारणीत काम करणाऱ्या व्यक्तींचा जेव्हा जेव्हा सत्कार होतो, तेव्हा समाजापुढे नवे आदर्श निर्माण होतात. ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांना या क्षेत्रात आणखी योगदान देण्यासाठी नैतिक बळ प्राप्त होते. शाळेपासून कोणीही वंचित राहू नये म्हणून सरकारबरोबरच समाजातील विविध घटक कार्यरत आहेत, ही देशाच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. भारती ठाकूर यांसारख्या लोकांकडून प्रेरणा घेऊन आणखी काही लोकांनी वंचित मुलाच्या शिक्षणासाठी काहीतरी करायला हवे.'

गोव्यातील मंदिर पर्यटनाचा संदर्भ घेत मुख्यमंत्री म्हणाले की, अध्यात्म पर्यटन, मंदिर पर्यटन यांसारख्या गोष्टींवर आम्ही भर देत आहोत. अख्ख्या भारतातील सर्वात स्वच्छ, सुंदर मंदिरे गोव्यात आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. भविष्यात कधीही मंदिरांवर सरकार कोणत्याच प्रकारचा अधिकार गाजवणार नाही. इथे येणाऱ्या लोकांनी मंदिराच्या माध्यमातून सांस्कृतिक अनुबंध आपल्याबरोबर घेऊन जावा, अशी इथल्या प्रत्येकाची इच्छा आहे.'

जीवन गौरव पुरस्कार प्राप्त भारती ठाकूर म्हणाल्या, 'वंचित मुलांना शिक्षण देताना वेगळाच परमानंद मिळतो. आज या कार्याचे कौतुक होत आहे. पण हे माझे एकट्याचे यश नाही. माझ्यामागे सामाजिक, आर्थिक, नैतिक ताकद उभे करणाऱ्या लोकांचे हे यश आहे. शाळा सोडणाऱ्या मुलांसाठी आपण सर्वजण मिळून काहीतरी करू. निःस्वार्थपणे काम करणाऱ्यांचा सन्मान हा कार्याला मदत करणाऱ्या प्रत्येक घटकांचा सन्मान असतो.'

कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष श्रीनिवास धेपे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. चतुरंगचे सदस्य डॉ. दत्ताराम देसाई यांनी प्रास्ताविक केले. विनय सहस्त्रबुद्धे यांनी निवड समितीच्यावतीने मनोगत व्यक्त केले.

'अब्दुल कलामांचा विक्रम मी मोडला' 

डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, 'शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान, बुद्धी, व्यक्त्ती, विचार, क्षमता संवर्धन पूर्वीपासून होतच आहे. भविष्यातही ते होईल. मात्र आज खरी गरज आहे ती मूल्य संवर्धित करणाऱ्या शिक्षणाची. भारती ठाकूर यांच्यासारख्या अनेक व्यक्ती आज यासाठी तळमळीने काम करत आहेत. आम्ही आमच्या परीने यात खारीचा वाटा उचलायला हवा. माझ्या तिसरी नापास आईने शिक्षणाचे महत्त्व माझ्या मनात बिंबवले. आज ५१ डी.लिट. पदव्या घेऊन मी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा विक्रम मोडला. गोमंतकीय सुपुत्राने हा विक्रम मोडला, याचा सार्थ अभिमान आहे. शिक्षणापासून वंचित मुले ठाकूर यांच्यासारख्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. त्यापैकीच एका मुलाने माझा विक्रम मोडला तर मला पुन्हा एकदा अभिमान वाटेल.'

 

Web Title: let create a skilled generation said cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.