कळंगुटमधून मजुरांंना हाकलले

By Admin | Updated: August 26, 2014 01:21 IST2014-08-26T01:19:22+5:302014-08-26T01:21:01+5:30

बार्देस : कळंगुट मतदारसंघात गैरकृत्ये, तसेच गुन्हे वाढण्यास परप्रांतीय मजूर जबाबदार असल्याचा दावा करत या मजुरांना हुसकावून लावण्याची मोहीम आमदार मायकल लोबो

Leased the laborers from Kalangut | कळंगुटमधून मजुरांंना हाकलले

कळंगुटमधून मजुरांंना हाकलले

बार्देस : कळंगुट मतदारसंघात गैरकृत्ये, तसेच गुन्हे वाढण्यास परप्रांतीय मजूर जबाबदार असल्याचा दावा करत या मजुरांना हुसकावून लावण्याची मोहीम आमदार मायकल लोबो यांनी हाती घेतली आहे. सोमवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास स्थानिक रहिवासी व पोलिसांच्या मदतीने कळंगुट, टिटो येथे जमलेल्या सुमारे ७00 लोकांची तेथून हकालपट्टी करण्यात आली. यापुढेही ही मोहीम अशीच चालू ठेवणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले आहे.
रविवारी प्रभूवाडो येथील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका १९ वर्षीय प. बंगालच्या युवकाने फूस लावून तिचे अपहरण केल्याने सध्या या भागातील वातावरण तापले आहे. परप्रांतीय लोक गोव्यात येतात आणि आपले बस्तान ठोकतात. चोऱ्या, दरोडे, खून, बलात्कार अशी कृत्ये करतात व आपल्या गावी निघून जातात. यांना वेळीच आवर घालणे आवश्यक आहे, असे ही मोहीम राबवणाऱ्यांचे म्हणणे आहे.
याविषयी लोबो म्हणाले की, कळंगुट मतदारसंघात परप्रांतीय कामगार व इतर लोक मोठ्या प्रमाणात आहेत. त्याबाबत आपले काही म्हणणे नाही; पण हे लोक आपली ओळख सांगणारी कागदपत्रे स्थानिक पोलीस स्थानकांत देत नाहीत. तसेच जे घरमालक भाडेकरू ठेवतात, तेही काळजी घेत नाहीत. त्यामुळे या लोकांचे आयते फावते. हे लोक चोऱ्या, खून, बलात्कार करून गोवा सोडून पळून जातात. सकाळी ७ ते ९.३० च्या दरम्यान कळंगुट, टिटो येथील शांतादुर्गा मंदिराजवळील बसस्टॉपवर कॉलेज व कामाला जाणाऱ्या मुली बससाठी थांबतात. या वेळेत सुमारे ५०० ते ७०० कामगार घोळक्याने येथे उभे असतात. त्यांचा त्रास स्थानिकांना होतो. या विरोधात कळंगुट पंचायतने कारवाई करणे आवश्यक आहे, असे आमदार लोबो म्हणाले.
रविवारी ज्या युवकाने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले, तो युवक भाड्याने राहत होता. मात्र, घरमालकाने पूर्ण नाव, पत्ता, फोटोही घेतला नव्हता. घरमालकाला त्याचे रामू एवढेच नाव माहीत आहे. त्यामुळे पोलिसांना त्याचा शोध घेणे कठीण झाले आहे, असे लोबो म्हणाले.
सोमवारी सकाळी मायकल लोबो यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक लोकांनी पोलीस निरीक्षक राजेशकुमार, उपनिरीक्षक नितीन हळर्णकर व इतर पोलिसांच्या मदतीने परप्रांतीय कामगारांना हाकलून लावले.
त्यातील काहींना पोलिसांनी ताब्यातही घेतले.
(प्रतिनिधी)

Web Title: Leased the laborers from Kalangut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.