लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचे नेतृत्व पाहून गोवाकाँग्रेसमध्ये अनेक राजकीय नेते प्रवेश करीत २०२७आहेत. च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब असल्याचे गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची बऱ्याच जणांची इच्छा आहे. अनेकांनी ती बोलूनसुद्धा दाखवली आहे. त्यानुसार त्यांना प्रवेश दिला जात आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वगुणांवर विश्वास ठेवून लोक पक्षात प्रवेश करण्यासाठी पुढे येत असल्याचे त्यांनी सांगितले. ठाकरे म्हणाले की, 'राज्यात लवकर जिल्हा पंचायत व पालिका निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने पक्षाने काम सुरू केले आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी हे सर्वांना एकत्र घेऊन काम करतात. त्यांच्यासारखे नेतृत्व पुढे यावे, असेच सर्वांना वाटत असून, त्यांचे काम पाहून राजकीय नेते पक्षात प्रवेश करीत आहेत.' आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यभरातील सर्व मतदारसंघांचा आढावा घेणे सुरू आहे. नेते, कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत आहे, असेही ते म्हणाले.
फॉरवर्डच्या उपक्रमाचा काँग्रेसवर परिणाम नाही
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी 'आमचो आवाज विजय' हा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत राज्यातील विविध भागांमध्ये जाऊन ते लोकांचे म्हणणे जाणून घेत आहेत. स्वतःचा पक्ष वाढवण्यावर ते भर देत आहेत, ही चांगली बाब आहे. गोवा फॉरवर्ड हा स्वतंत्र पक्ष असल्याने त्याचा काँग्रेसवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे ठाकरे यांनी नमूद केले.