रेंगाळलेला तिकीट घोटाळा साक्षीदारांच्याच विस्मृतीत
By Admin | Updated: August 22, 2014 01:29 IST2014-08-22T01:27:51+5:302014-08-22T01:29:30+5:30
सुशांत कुंकळयेकर ल्ल मडगाव २00१ मध्ये फक्त गोव्यातील नव्हे तर देशातील क्रिकेट विश्व हादरवून टाकणारा आणि एकेकाळी राजकारणातले

रेंगाळलेला तिकीट घोटाळा साक्षीदारांच्याच विस्मृतीत
सुशांत कुंकळयेकर ल्ल मडगाव
२00१ मध्ये फक्त गोव्यातील नव्हे तर देशातील क्रिकेट विश्व हादरवून टाकणारा आणि एकेकाळी राजकारणातले ‘स्ट्रॉँग मॅन’ दयानंद नार्वेकर यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आणणारा कुप्रसिद्ध क्रिकेट तिकीट घोटाळा साक्षीदारांच्या विस्मृतीत गेल्याचे सध्या दिसून येते. तेरा वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणाची सुनावणी सध्या मडगावच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पूजा कवळेकर यांच्या न्यायालयात चालू आहे. या प्रकरणातील साक्षीदारांना आता जुन्या घटना आठवणीत नाहीत, असे समजले. एवढेच नव्हे तर तेरा वर्षांत कित्येक साक्षीदारांचे घराचे पत्ते बदलल्याने त्यांना शोधावे कुठे, हा बिकट प्रश्न पोलिसांना पडला आहे.
६ एप्रिल २00१ रोजी फातोर्ड्यातील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय क्रिकेट सामना आयोजिला होता. त्यापूर्वी या मालिकेत दोन-दोन अशी बरोबरीची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे गोव्यातील या निर्णायक सामन्याचे महत्त्व वाढले होते. तो पाहण्यासाठी प्रेक्षकांची झुंबड उडालेली. फातोर्डा स्टेडियममध्ये जागाच शिल्लक नसल्याने तिकिटे असूनही प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश करता आला नव्हता. प्रेक्षकांच्या या लोंढ्याला थोपविण्यासाठी पोलिसांना शेवटी लाठीमार करावा लागला होता.
मडगाव पोलिसांच्या दाव्याप्रमाणे, फातोर्डा स्टेडियमची क्षमता २४ हजार प्रेक्षकांना सामावून घेण्याची असताना त्याहीपेक्षा अधिक बनावट तिकिटे छापली होती. या सर्व प्रकरणात सुमारे ६८ लाखांचा घोटाळा झाला होता. गोवा क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष दयानंद नार्वेकर, सध्याचे अध्यक्ष विनोद फडके यांच्यासह एकूण ९ जणांवर या प्रकरणात आरोपपत्र दाखल आहे. ही घटना होऊन १३ वर्षे उलटली तरी हा खटला मात्र प्राथमिक स्थितीतच आहे. आतापर्यंत केवळ वीसजणांच्या साक्षी न्यायालयासमोर येऊ शकल्या आहेत. कित्येकवेळा साक्षीदारांनी विसंगत अशा साक्ष दिल्याचेही उघड झाले आहे. यापैकी कित्येकांनी घटना आठवत नाही, असे साक्षीत सांगितले आहे. न्यायालयीन सूत्राकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, आतापर्यंतच्या साक्षींपैकी माजी मंत्री ज्योकिम आलेमाव तसेच या प्रकरणातील संशयित एकनाथ नाईक यांच्या पत्नीसह एकूण पाच साक्षीदारांनी साक्षी फिरवल्या आहेत.