ड्रोनद्वारे होणार जमिनींच्या नोंदी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2025 09:11 IST2025-02-18T09:10:03+5:302025-02-18T09:11:10+5:30
पणजी, मडगाव, कुंकळ्ळी पालिकांची निवड

ड्रोनद्वारे होणार जमिनींच्या नोंदी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज शुभारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: शहरी व निमशहरी भागांमध्ये जमिर्नीच्या नोंदी अद्ययावत तंत्रज्ञानाने तयार करण्यासाठी केंद्राच्या 'नक्षा' कार्यक्रमांतर्गत गोव्यातील पणजी महापालिका, तसेच मडगाव व कुंकळ्ळी पालिका क्षेत्राची निवड झाली आहे. या शहरांमध्ये लवकरच ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जाईल.
राज्ये, केंद्रशासित प्रदेशातील मिळून १५२ पालिका या 'नक्षा' कार्यक्रमासाठी निवडण्यात आलेल्या आहेत. सर्वे ऑफ इंडिया यात तांत्रिक भागीदार आहे. गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत मंगळवारी या उपक्रमाचे उद्घाटन करतील.
डिजिटल इंडिया लॅण्ड रेकॉर्डअंतर्गत जमिनीच्या नोंदींचे डिजिटायझेशन झाल्यानंतर धोरण आणि नियोजनात त्याचा फार मोठा फायदा होणार आहे. शहरी जमिनींच्या नोंदींच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. मालमत्ता रेकॉर्ड सुटसुटीत होतील. विविध माध्यमातून सार्वजनिक सेवा वितरणाची परिणामकारकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे उपयुक्त ठरणार आहे.
२२ जानेवारी रोजी दक्षिण विभागाच्या अतिरिक्त सर्वेअर जनरलनी ६ राज्यांमध्ये थ्रीडी मॅपिंग करण्याची जबाबदारी सोपवली आहे. गोवा, केरळ व तामिळनाडूमध्ये ड्रोनद्वारे सर्वेक्षण होईल. आंध्र प्रदेश, तेलंगणा व महाराष्ट्रातही ड्रोनद्वारेच सर्वेक्षण होईल. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अचूक मॅपिंग होईल. अधिकाऱ्यांना लिडार, डेटा एकत्रीकरण, ऑर्थो-रेक्टिफाइड इमेजरी आणि डिजिटल एलिव्हेशन मॉडेल्स वर्कफ्लो आदीचे प्रशिक्षण दिले जाईल.
थ्रीडी जीआयएस डेटाबेस
शहरांमधील भू-नोंदणी अद्ययावत करताना थ्रीडी जीआयएस डेटाबेस तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अचूक एरियल फोटोग्राफीमुळे जमीन सर्वेक्षणाचा वेग वाढेल. मालमत्ता कर मूल्यांकनात उपयुक्त ठरेल. वाहतूक व्यवस्था, गटार व्यवस्था आणि पूर व्यवस्थापनाचे नियोजन यासाठी मास्टर प्लॅन तयार करणे सुलभ होईल.