कुळें - वास्को रेल डबल ट्रॅकचा मार्ग मोकळा
By किशोर कुबल | Updated: March 19, 2023 20:27 IST2023-03-19T20:27:00+5:302023-03-19T20:27:35+5:30
आक्षेप फेटाळून भूसंपादन भरपाई नोटीस जारी

कुळें - वास्को रेल डबल ट्रॅकचा मार्ग मोकळा
किशोर कुबल, पणजी: गोव्यात दक्षिण पश्चिम रेल्वेच्या कुळें ते वास्को रेल मार्ग दुपदरीकरणासाठी लोकांचा विरोध डावलून, पर्यावरणप्रेमींसह इतर जागरुक नागरिकांनी नोंदवलेले आक्षेप फेटाळून भूसंपादन भरपाई नोटीस जारी करण्यात आली आहे.
कुडचडें, काकोडा, सावर्डे, सां जुझे द आरियल, चांदर, गिर्दोली, वेळसांव व इसोर्सी गावांमधील एकूण ०.९९८५ हेक्टर जमीन संपादित केली जाईल. उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी, वास्को यांच्या कार्यालयाने हॉस्पेट - हुबळी - तिनाघाट - वास्को-द-गामा दुहेरीकरण या विशेष रेल्वे प्रकल्पासाठी भरपाई जाहीर करणारी सार्वजनिक सूचना जारी केली आहे. हा प्रकल्प रेल विकास निगम लिमिटेडद्वारे कार्यान्वित केला जात आहे.
कुळें ते वास्को रेल्वे मार्ग दुपदरीकरणाच्या सार्वजनिक उद्देशासाठी रेल्वे कायदा, १९८९ अंतर्गत भारत सरकारच्या दक्षिण पश्चिम रेल्वेकडून जमीन संपादित करण्याचा हा प्रस्ताव आहे.