काँग्रेस सेवा दलाची सूत्रे किर्लपालकरांकडे
By Admin | Updated: January 31, 2015 02:32 IST2015-01-31T02:12:10+5:302015-01-31T02:32:50+5:30
युवक काँग्रेसच्या माजी अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांच्याकडे गोवा महिला काँग्रेस समितीची जबाबदारी

काँग्रेस सेवा दलाची सूत्रे किर्लपालकरांकडे
पणजी : काँग्रेस पक्षाने संघटनात्मक पातळीवर अनेक बदल सुरू केले असून शुक्रवारी जारी झालेल्या दोन वेगवेगळ््या आदेशांद्वारे शंकर किर्लपालकर यांच्याकडे गोवा राज्य सेवा दलाचे मुख्य आयोजकपद सोपविण्यात आले आहे. तसेच युवक काँग्रेसच्या माजी अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांच्याकडे गोवा महिला काँग्रेस समितीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
लुईझिन फालेरो यांच्या सहीने दोन्ही आदेश जारी झाले आहेत. किर्लपालकर यांच्या नियुक्तीस काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही मान्यता दिली असल्याचे फालेरो यांनी म्हटले आहे. प्रतिमा कुतिन्हो या प्रदेश काँग्रेस समितीच्या सरचिटणीस आहेत. त्यांनी महिला काँग्रेस गोव्यात बळकट करावी म्हणून पावले उचलावीत व महिला काँग्रेसच्या सर्व उपक्रमांसाठी समन्वयक म्हणून त्यांनी काम करावे, असे फालेरो यांनी आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी आणि आमदार यांची काँग्रेस हाउसमध्ये शुक्रवारी संयुक्त बैठक पार पडली. नऊपैकी दोनच आमदार शुक्रवारी उपस्थित राहिले. विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे व पांडुरंग मडकईकर यांनी बैठकीत भाग घेतला.
(खास प्रतिनिधी)