खाप्रेश्वर मूर्तीची अखेर त्याच ठिकाणी प्रतिष्ठापना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 07:41 IST2025-07-22T07:40:54+5:302025-07-22T07:41:31+5:30
मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांची सोहळ्याला उपस्थिती

खाप्रेश्वर मूर्तीची अखेर त्याच ठिकाणी प्रतिष्ठापना
लोकमत न्यूज नेटवर्क, पर्वरी : पर्वरी महामार्गावरील उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी अडथळे होत असल्याने हटवण्यात आलेले येथील वडाकडे (सुकूर) येथील खाप्रेश्वर मंदिरात देवाच्या मूर्तीची त्याच जागी प्रतिष्ठापना करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी येथून मंदिर हटविण्यात आले होते.
सोमवारी (दि. २१) खाप्रेश्वर देवाच्या मूर्तीची पुनःप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी सकाळी प्राकार शुद्धी, देवता पूजन, हवन, देवता प्रतिष्ठापन, प्राणप्रतिष्ठा इत्यादींसह धार्मिक विधी,
दुपारी आरती, महागाऱ्हाणे घालून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
खाप्रेश्वर मंदिर आणि त्या बाजूचा वटवृक्ष हटवण्याचे काम संबंधित खात्याने हाती घेतले होते. त्याबद्दल न्यायालयात तेथील ग्रामस्थांनी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने वटवृक्ष हटवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात वटवृक्ष आणि खाप्रेश्वर देवाची मूर्ती हटवण्यात आली. या प्रकाराबद्दल ग्रामस्थांमध्ये आणि भाविकांमध्ये नाराजी पसरून तणावाचे वातावरण होते.
लोकभावनेचा मुख्यमंत्र्यांकडून आदर
सरकारने अन्य ठिकाणी देवस्थान उभारण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, ग्रामस्थांनी खाप्रेश्वर देवाची मूर्ती त्याच जागी बसविण्याचा आग्रह धरला. या प्रकरणात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करून मूर्ती त्याच जागी बसवणार, असे आश्वासन दिले. तेथील मंदिरासाठी लागणारी जमीन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते.