म्हादाई प्रकल्पाविरोधात खानापूरकरांचा एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 12:19 IST2025-04-10T12:18:53+5:302025-04-10T12:19:48+5:30
खानापूरला संकटात लोटणारा म्हादाई प्रकल्प मागे घेण्याची मागणी.

म्हादाई प्रकल्पाविरोधात खानापूरकरांचा एल्गार
लोकमत न्यूज नेटवर्क, बेळगाव: म्हादाई वळणाच्या (ड्रायव्हर्जन) प्रकल्पामुळे खानापूर तालुक्यातील पश्चिम घाटाच्या नियुक्त पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात जंगलतोड आणि विखंडन करून अपरिवर्तनीय नुकसान होणार आहे. याखेरीज संपूर्ण खानापूर तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. या खेरीज अन्य इतर कारणास्तव म्हादाई वळण प्रकल्पाला पर्यावरण प्रेमींसह खानापूर तालुक्यातील समस्त जनतेने संपूर्ण विरोध दर्शवला असून हा प्रकल्प तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे आज बुधवारी उपजिल्हाधिकारी बेळगाव आणि खानापूर तहसीलदारांच्या माध्यमातून सरकारकडे केली आहे.
म्हादाई नदी कर्नाटक सरकार खानापूर तालुक्यातील म्हादाई नदीचे पाणी वळवून ते हुबळी, धारवाड परिसरात नेण्याच्या तयारीत आहे. तसे झाल्यास खानापूर तालुक्यावर मोठे संकट कोसळणार आहे. त्यामुळे म्हादाई प्रकल्पाच्या विरोधात 'खानापूर वाचवा, पाऊस वाचवा, शेतकऱ्यांना वाचवा' या शीर्षकाखाली आज बुधवारी खानापूर बस स्थानकाजवळील वागळे कॉलेज सभागृहात पर्यावरण प्रेमी आणि तालुक्यातील जनतेची बैठक पार पडली. कर्नाटक सरकार खानापूर तालुक्यातील म्हादाई नदीचे पाणी वळवून ते हुबळी, धारवाड परिसरात नेण्याच्या तयारीत असल्यामुळे या नदीचे भवितव्य धोक्यात आले आहे.
म्हादाई नदीच्या खोऱ्यावर सुमारे ७०० चौ.कि.मी. जंगल अवलंबून आहे. हे जंगल खानापूर परिसरात मुबलक पाऊस पाडण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळेच खानापूरला दक्षिण चेरापुंजी म्हणून ओळख मिळाली आहे. खानापूर तालुक्याचे भवितव्य याच पावसावर आणि नद्यांवर अवलंबून आहे. जर म्हादाई नदीचा नैसर्गिक प्रवाह रोखून तिचे पाणी दुसरीकडे वळवल्यास खानापूर तालुक्यातील पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटणार आहे.
यावेळी म्हादाई प्रकल्पामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती चित्रफित आणि व्हिडिओच्या माध्यमातून सादर करण्यात आली. तसेच सदर प्रकल्प विरुद्धची ही लढाई केवळ पिण्याच्या पाण्यासाठी नव्हे तर संपूर्ण परिसराच्या पर्यावरणाची, पावसाची, हवामानाची आणि भवितव्याची लढाई असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. त्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी बेळगाव आणि खानापूर तहसीलदारांना म्हादाई वळण प्रकल्पा विरोधात निवेदन सादर करून सदर प्रकल्प तात्काळ मागे येण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली.
आजच्या बैठकीस दिलीप कामत, शिवाजी कागणीकर, सुजित मुळगुंद, कॅ. नितीन धोंड, अॅड. एन. आर. लातूर, जगदीश होसमणी, मल्लिकार्जुन माळी, सिद्धगौडा मोदगी, श्रीमती शारदा गोपाळ, गीता साहू, काशिनाथ नाईक, शंकरांना लंगटी, बसनगौडा पाटील, विल्सन कार्वालो आदींसह बहुसंख्य पर्यावरणप्रेमी आणि नागरिक उपस्थित होते.