कर्नाटकमुळे म्हादई नदीतील पाण्याची पातळी खालावली, मुख्यमंत्र्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 19:38 IST2020-11-27T19:38:23+5:302020-11-27T19:38:52+5:30
pramod sawant : कर्नाटक जोपर्यंत पाणी गोव्यात सोडत नाही, तोपर्यंत कर्नाटकशी आम्ही म्हादईप्रश्नी कसलीच बोलणी करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले

कर्नाटकमुळे म्हादई नदीतील पाण्याची पातळी खालावली, मुख्यमंत्र्यांचा दावा
पणजी : म्हादई नदीतील पाण्याची गोव्याच्या बाजूने पातळी कमी झालेली आहे. कर्नाटकने पाणी वळविल्याने असे घडले आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी येथे सांगितले. कर्नाटक जोपर्यंत पाणी गोव्यात सोडत नाही, तोपर्यंत कर्नाटकशी आम्ही म्हादईप्रश्नी कसलीच बोलणी करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
कर्नाटकने म्हादई नदीचे पाणी वळविले व त्यामुळे गोव्यात पाण्याची पातळी कमी झाली हे आपण भाजपचे गोवा प्रभारी असलेले कर्नाटकचे आमदार सी. टी. रवी यांनाही सांगितले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी येथे पत्रकारांना सांगितले. कर्नाटकने अवमान केला आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात यापूर्वीच अवमान याचिका सादर केली असून त्यावर आम्ही ठाम आहोत.
कर्नाटकशी आम्हाला न्यायालयाच्या कक्षेबाहेर जाऊन कोणतीच चर्चा करायची नाही. आपल्याला कर्नाटकमधील नुकतीच एक व्यक्ती भेटली तेव्हा त्या व्यक्तीसोबतही आपण म्हादईविषयी काहीच चर्चा केली नाही. म्हादईचा जो प्रवाह कर्नाटकने वळविला तो प्रवाह अगोदर गोव्यात सोडा, मग चर्चेविषयी पाहू अशी गोव्याची भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दुधसागरवरही परिणाम
मगोपचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांनी म्हादईची पाण्याची पातळी गोव्यात घटल्याचे दीड वर्षापूर्वीच सांगून तशी छायाचित्रेही सादर केली होती. कर्नाटकच्या योजनेमुळे यापुढे दुधसागर धबधबाही बंद होईल, असे ढवळीकर यांनी शुक्रवारी सांगितले. पातळी घटली हे सरकार आता दीड वर्षाने मान्य करते असे ढवळीकर म्हणाले.