शिरोडा येथे झाडावर धडकली कदंबा, 11 प्रवासी जखमी
By आप्पा बुवा | Updated: September 17, 2023 16:55 IST2023-09-17T16:55:39+5:302023-09-17T16:55:58+5:30
बिबळ येथील धोकादायक वळणावर बसचे स्टेरिंग लॉक झाले. परिणामी ड्रायव्हरचा बस वरील ताबा सुटला व बसने सरळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडावर जोरदार धडक दिली.

शिरोडा येथे झाडावर धडकली कदंबा, 11 प्रवासी जखमी
फोंडा - बिबळ शिरोडा येथे सकाळी सव्वा सातच्या दरम्यान एका धोकादायक वळणावर कदंबा प्रवासी बसचा तोल गेला व बसने सरळ आंब्याच्या झाडाला धडक दिली. सदर अपघातात एकूण 11 प्रवासी जखमी झाले आहेत त्यापैकी तीन प्रवाशावर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले तर इतर आठ जणांवर अजूनही इस्पितळात उपचार चालू आहेत.
सविस्तर वृत्तानुसार फोंडा असा दररोज प्रवास करणारी कदंबा क्रमांक जी ए-०३- एक्स -०४१४ ही नेहमीप्रमाणे प्रवासी घेऊन फोंडा कडे येण्यासाठी निघाली होती. बिबळ येथील धोकादायक वळणावर बसचे स्टेरिंग लॉक झाले. परिणामी ड्रायव्हरचा बस वरील ताबा सुटला व बसने सरळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडावर जोरदार धडक दिली. सदरची धडक बसताच बसमध्ये बसलेल्या प्रवाशी एकमेकावर आपटल्याने तसेच सीट वर पडल्याने 11 प्रवासी जखमी झाले. जखमी प्रवासीना तातडीने अगोदर शिरोडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यापैकी आठ लोकांना अधिक उपचाराची गरज भासताच त्यांना मडगाव येथील होस्पिसिओमध्ये दाखल करण्यात आले. किरकोळ जखमी झालेल्या तिघांना उपचार करून घरी पाठविण्यात आले.
यात जखमी झालेली सुचिता गावकर (४०, पाज -शिरोडा) हिला अधिक उपाचारासाठी गोमेकोत नेण्यात आले आहे. तर बस चालक राघोबा नाईक (५४, भाटी ), बस वाहक गुणा गावकर ५७, बोरी) येसू वेळीप (६५, पाज -शिरोडा ), सुनीता गावकर (४३), चंद्रिका गावकर (४१), सुलक्षा गावकर (४५), अनिशा वेळीप (५२,सर्व जण बिबळ- शिरोडा) अशी जखमी प्रवाशांचे नावे आहेत.
निमुळता रस्ता अपघातास कारण
सदरचा रस्ता हा खूपच निमुळता व अरुंद असल्याने येथे वारंवार अपघात घडत असतात. काही दिवसापूर्वी या परिसरात एक बालरथ अशाच प्रकारे अपघात ग्रस्त झाला होता. सरकारने हा रस्ता रुंद करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.
सुट्टी नसते तर?
इथून निघणारी ही पहिली बस असल्याने ह्या बस वर नेहमी प्रवाशांची गर्दी असते. औद्योगिक वसाहत व इतर ठिकाणी कामाला जाणारे प्रवासी या बसचा पर्याय निवडतात. त्यामुळे नेहमी ही बस खचाखच भरलेली असते. काल रविवार असल्याने प्रवासी कमी होते.
जास्त विक्रेत्या महिला
कालपासून फोंडा येथे माटोळी सामान विक्रीस आलेले असून सदर बस मध्ये सुद्धा फोंडा येथे माटोळीचे सामान विक्रीस नेणाऱ्या महिला विक्रेत्या प्रवास करत होत्या. प्रवासी वाहन अपघात ग्रस्त झाल्याने त्यांना बाजार सोडून इस्पितळात जावे लागले. माजी जिल्हा पंचायत सदस्य जयदीप शिरोडकर यांना सदर अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व आपल्या स्वतःच्या वाहनाने काही जखमींना इस्पितळात पोहोचवले.