जॉन यांची गच्छंती अटळ

By Admin | Updated: August 25, 2014 01:04 IST2014-08-25T01:04:27+5:302014-08-25T01:04:48+5:30

रवी, ज्योकिम, सार्दिनही रडारवर : काँग्रेस ‘परिवर्तना’च्या गर्तेत, पक्ष स्वच्छ करण्याची मोहीम तीव्र

John's furrow is inevitable | जॉन यांची गच्छंती अटळ

जॉन यांची गच्छंती अटळ

पणजी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याने कोणत्याही क्षणी त्यांना या पदावरून डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. जॉन यांनी गेले काही दिवस पक्षविरोधी कारवाया केलेल्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचे सत्र आरंभले आहे, तसेच काँग्रेस भवनात खाणमालक भालचंद्र नाईक यांच्याबरोबर त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांच्यावर जे आरोप झाले, ते प्रकरणही जॉन यांना महागात पडले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जॉन यांच्याबाबत तक्रारी वाढल्याने श्रेष्ठी त्यांच्यावर नाराज आहेत.
जॉन यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटविल्याच्या वृत्ताने खळबळ माजली होती. त्यावर जॉन यांनी आपले विरोधकच हा अपप्रचार करीत असल्याचा आरोप केला. एका इंग्रजी दैनिकातील या संदर्भातील बातमी ही ‘पेड न्यूज’ असल्याचे ते म्हणाले. प्रदेश समितीने या वृत्ताचा निषेध केला. जॉन म्हणाले की, आपण हे पद मागून घेतलेले नाही किंवा या पदावर राहण्यासाठी आपला आटापिटाही नाही. लोकसभा निवडणुकीत दक्षिणेचीही जागा काँग्रेसने गमावली तेव्हा नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण राजीनामा दिला होता; परंतु श्रेष्ठींनी तो स्वीकारला नाही. दिग्विजय सिंह यांनी आपल्याला या पदावर राहण्यास सांगितले. पक्षविरोधात वावरणाऱ्या तसेच भ्रष्ट काँग्रेसी नेत्यांविरुद्ध आपण बेधडक कारवाई सुरू केल्याने काहीजण आपल्या विरोधात गेले आहेत. त्यांना मी या पदावर नको म्हणूनच ते अशा प्रकारच्या कंड्या पिकवीत आहेत, असे जॉन म्हणाले.
राज्यात काँग्रेस सरकार नाही आणि केंद्रातही नाही, अशा परिस्थितीत आपण अध्यक्षपदासाठी का म्हणून चिकटून राहणार? पक्ष चालविण्यासाठी पैसा लागतो. प्रदेशाध्यक्षपदाचा ताबा आपण घेतला तेव्हा कॉँग्रेस भवनातील कर्मचाऱ्यांचे माजी अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांच्या काळातील तीन महिन्यांचे वेतन द्यायचे होते, ते आपण स्वत:च्या खिशातून दिले. मला प्रदेशाध्यक्षपदी राहण्याची मोठी हौस नाही. गेली ४३ वर्षे आपण पक्षाशी एकनिष्ठ आहे. निर्मला सावंत, सुलोचना काटकर यांना प्रदेशाध्यक्षपदी मीच आणले होते, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, माजी आ. जितेंद्र देशप्रभू म्हणाले, सर्व काही तरुणांच्या हाती देण्यासाठी अशा कारवाया सुरूच राहिल्या तर काँग्रेसला सत्तेसाठी आणखी २५ वर्षे लागतील. पक्षात राजकीय दृष्टिकोन ठेवणारे कोणी शिल्लक राहणारच नाहीत.
पक्ष सुधारण्यासाठी कारवाया हा तोडगा
नव्हे. त्याऐवजी पक्षाचे सदस्य वाढवा, गट समित्या तसेच अन्य समित्या सक्रिय करा. ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे ते
आधी मंत्रिपदाची धुरा सांभाळत होते, आमदार होते. अशा नेत्यांवर कारवाईआधी नेतृत्वाने निदान संवाद तरी साधला पाहिजे.
माजी आमदार बाबू आजगावकर म्हणाले की, एखाद्याने पक्षात राहून विरोधी कारवाया केल्याचे पुरावे असल्यास त्याच्यावर कारवाई व्हायलाच हवी; परंतु वरवरच्या ऐकीव वृत्तांनी कारवाई करणे योग्य नव्हे. तो अन्याय ठरेल. प्रदेशाध्यक्षपदी असलेल्या व्यक्तीने सर्वांना सोबत घेऊन पुढे गेले पाहिजे. आपले तेच खरे म्हणून उपयोगी नाही. तसे केल्यास पक्षही संपेल आणि ती व्यक्तीही, असे बाबू म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: John's furrow is inevitable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.