नोकऱ्यांची निर्मिती ठप्प
By Admin | Updated: January 25, 2015 01:42 IST2015-01-25T01:38:46+5:302015-01-25T01:42:24+5:30
शासकीय, खासगी क्षेत्रात ‘मंदी’ : शासकीय तिजोरीला मर्यादा; उद्योगही रोडावले

नोकऱ्यांची निर्मिती ठप्प
पणजी : गेली तीन वर्षे शासकीय तिजोरीला मोठी आर्थिक झळ बसल्यामुळे प्रशासनात नव्या नोकऱ्या तयार होण्याची प्रक्रिया बरीच मंदावली आहे. उद्योगही संख्येने खूप कमी येत असल्याने खासगी क्षेत्रातही नव्या नोकऱ्या तयार होण्याचे प्रमाण अत्यल्प बनले आहे. एकंदरीत शासकीय व खासगी क्षेत्रात नोकऱ्यांची निर्मिती जवळजवळ थांबली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या सध्या ५५ हजार आहे. दर महिन्याला १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम सरकारला कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च करावी लागत आहे. आर्थिक स्थिती ठीक नसल्याने सरकारने नवी पदे निर्माण करण्यावर व रद्द झालेली पदे पुनरुज्जीवित करण्यावरही निर्बंध लागू केले आहेत. गेल्या तीन वर्षांतही जास्त शासकीय नोकऱ्या निर्माण झाल्या नाहीत. पोलीस खात्यात थोडीफार भरती झाली. मात्र, पीएसआय भरती वादग्रस्त ठरली. आता पुढील दोन वर्षांत शासकीय क्षेत्रात जास्त नोकऱ्या निर्माण होणार नाहीत.
मोठे उद्योग गोव्यात येतात व त्यामुळे खासगी क्षेत्रात नोकऱ्या निर्माण होतात, असेही दिसून येत नाही. गोव्यात अस्तित्वात असलेल्याच थोड्या उद्योगांचा विस्तार होत आहे. सरकारने गुंतवणूक धोरण तयार केले व गुंतवणूक मंडळ बनविले, तरीही एकदेखील मोठा उद्योग गोव्यात आलेला नाही. पुढील दोन वर्षांत खासगी क्षेत्रात किती रोजगार संधी निर्माण होतील, हेही सरकार नीटपणे सांगू शकत नाही. सत्तेवर आल्यानंतर पाच वर्षांत ५० हजार नोकऱ्या निर्माण करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते; पण उद्योगमंत्री महादेव नाईक यांनी हे लक्ष्य २०१७ पर्यंत गाठता येणार नाही, हे अलीकडेच स्पष्ट केले आहे.
(खास प्रतिनिधी)