नव्या वर्षात नोकऱ्या 'सुसाट'; भरती प्रक्रियेवर सरकारचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2025 07:20 IST2025-01-01T07:20:16+5:302025-01-01T07:20:16+5:30

'पारदर्शकते'च्या 'परीक्षे'त सरकारलाही व्हावे लागेल 'उत्तीर्ण'

jobs available in the new year government focuses on recruitment process | नव्या वर्षात नोकऱ्या 'सुसाट'; भरती प्रक्रियेवर सरकारचा भर

नव्या वर्षात नोकऱ्या 'सुसाट'; भरती प्रक्रियेवर सरकारचा भर

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सरत्या वर्षात नोकऱ्या विक्री प्रकरणाने युवा वर्गाच्या स्वप्नांचा चक्काचूर केला असला तरी आजपासून सुरू होणाऱ्या नव्या वर्षात मात्र सरकारी खात्यांमध्ये कर्मचारी निवड आयोगाच्या माध्यमातून नोकऱ्यांचा धमाका लागणार आहे. विविध खात्यांमध्ये मिळून सुमारे ६१७५ जागा रिक्त आहेत. यापैकी एक- तृतीयांश जरी पदे भरली तरी दोन ते अडीच हजार बेरोजगारांना नोकऱ्या प्राप्त होतील व यामुळे वर्षारंभी एकूणच आशादायी चित्र निर्माण झाले आहे.

सरकारी कार्यालयांमध्ये नोकर भरतीसाठी पारदर्शकता यावी, याकरिता सरकारने स्थापन केलेल्या राज्य कर्मचारी निवड आयोगाची नवीन वर्षाच्या प्रारंभीच तब्बल २३२ एलडीसी पदांसाठी २२ हजार अर्ज हाताळण्यासाठी कसोटी लागणार आहे. प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोगाला उमेदवार हाताळावे लागणार आहेत. नोकऱ्या पैसे घेऊन नव्हे, तर गुणवत्तेच्या आधारावरच पारदर्शक पद्धतीने दिल्या जातात, हे या भरतीतून सरकारने जनतेला दाखवून द्यावे लागेल. एका अर्थी 'पारदर्शकते'च्या या 'परीक्षे'त सरकारलाही पास व्हावे लागेल.

राज्य कर्मचारी निवड आयोगाला विविध सरकारी खात्यांनी रिक्त जागांची माहिती याआधीच पाठवली आहे. शिक्षण खाते, वीज खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, आरोग्य खाते, वाहतूक खाते, पर्यटन खाते जलत्रोत खाते तसेच वन व इतर खात्यांमध्ये तसेच पोलिस व अग्निशामक दलात अनेक पदे रिक्त आहेत. त्याची भरती प्रक्रिया आगामी काळात केली जाईल अशी चिन्हे आहेत. त्यामुळे नोकऱ्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या युवा वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रत्येक खात्याने एकदाच वषरिंभी जानेवारीत रिक्त पदांची माहिती आयोगाला सादर करणे अनिवार्य आहे. त्यामुळे आणखी रिक्त पदांची माहिती चालू महिन्यात आयोगाकडे येईल व त्यानुसार भरती केली जाईल. आयोगाकडून आवश्यकतेचे पुनरावलोकन केले जाते आणि नंतरच नियुक्तीची प्रक्रिया सुरू होते. 

संगणकाधारीत परीक्षा दिल्यानंतर २४ तासात आयोग आपल्या वेबसाइटवर निकाल जाहीर करतो. निकालाबद्दल काही तक्रार असल्यास ती सादर करण्यास उमेदवारांना तीन दिवस दिले जातात व चौथ्या दिवशी तक्रारी तज्ञांकडे पुनरावलोकनासाठी पाठवल्या जातात.

राज्यात सुमारे ६५ हजार सरकारी 3 कर्मचारी आहेत. एक वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते दरवर्षी १.५ ते २ टक्के कर्मचारी सेवेतून निवृत्त होतात. त्यामुळे तेवढ्या जागा रिक्त होत असतात.

१९२५ पदांची येणार जाहिरात

प्राप्त माहितीनुसार गोवा कर्मचारी निवड आयोग लवकरच विविध सरकारी खात्यांमध्ये १,९२५ पदांसाठी जाहिराती देणार आहे. शिक्षण खात्याने गेल्या वर्षी इंग्रजी शिक्षकांची ३६ पदे जाहीर केली होती. कर्मचारी निवड आयोगामार्फत यावर्षी परीक्षा घेऊन ही पदे भरली. या ३५ पदांसाठी १,५४० अर्ज शिक्षण खात्याकडे आले होते.

२४ तासांत निकाल : दौलतराव हवालदार

राज्य कर्मचारी निवड आयोगाचे सदस्य दौलतराव हवालदार म्हणाले की, खात्यांकडून जशी मागणी येईल, तशी पदे भरली जातील. २३२ एलडीसी पदांसाठी २२ हजार अर्ज आलेले आहेत. संगणाकाधारित सीबीआरटी परीक्षा एकाच वेळी घेण्यासाठी पुरेशी आसन क्षमता व सुविधा नाहीत. या परीक्षा २ फेब्रुवारीपर्यंत चालतील. परीक्षेनंतर २४ तासांत निकाल लावला जातो.'

यांना मिळणार प्राधान्य 

सरकारने मुख्यमंत्री अप्रेंटीशीप योजनेखाली सरकारी कार्यालये व खाजगी आस्थापनांमध्ये ८,८५२ युवकांची अप्रेंटिस म्हणून नियुक्ती केली होती. त्यापैकी अनेकांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. या उमेदवारांना सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे.

 

Web Title: jobs available in the new year government focuses on recruitment process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.