आधुनिक विकासाबरोबरच परंपरा जपणे गरजेचे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 07:58 IST2025-05-26T07:58:13+5:302025-05-26T07:58:58+5:30
मये महोत्सवाचा थाटात समारोप

आधुनिक विकासाबरोबरच परंपरा जपणे गरजेचे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : चौफेर विकासाची गरुडझेप घेत असतानाच विकासाबरोबरच आपल्या परंपरा, संस्कृती, गावदेखील तितक्याच आत्मीयतेने जपणे गरजेचे आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेली संस्कृती नव्या पिढीने जपावी यासाठी ग्रामीण भागातून मये महोत्सवासारखे महोत्सव हे उत्तम माध्यम आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मये येथे केले.
रायझिंग युथ मये, कला आणि संस्कृती खाते, विजयानंद ज्ञान प्रसारक संस्था व महामाया हायस्कूल माजी विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे आयोजित दोनदिवसीय तिसऱ्या मये महोत्सव समारोप सोहळ्यास मुख्यमंत्री सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष डॉ. पूर्णानंद चारी, स्वागत अध्यक्ष दयानंद कारबोटकर, माजी आमदार धर्मा चोडणकर, डॉ. स्नेहा भागवत, आयोजन समितीचे अध्यक्ष रूपेश ठाणेकर, कमलाकांत तारी, विविध पंचायतीचे सरपंच, सदस्य उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हभप शिवलीला पाटील (कीर्तनकार), शुभदा गावकर, सीताराम सावंत, कमलावती चोडणकर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. पूर्णानंद च्यारी, धर्मा चोडणकर, डॉ. स्नेहा भागवत, दया कारबोटकर यांनी विचार मांडले. रूपेश ठाणेकर यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. यावेळी शिवलीला पाटील यांनी कीर्तन सादर केले.
शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन करावे
आपली लोकगीते, लोककला, धालो गीत या जुन्या परंपरा, गीते आहेत त्या गीतांचे संवर्धन करण्यासाठी नव्या पिढीने विशेष योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन लाभण्याची गरज आहे, काही शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवत नसल्याने त्यांचे भवितव्य रखडते व चुकीच्या मार्गाने गेल्याने त्याचा जीवनावरही परिणाम होतो. शिक्षकांनी याचे भान ठेवून योग्य मार्गदर्शन करावे. तरुणांनी गोव्याची दिशा ठरवावी त्यासाठी आत्मनिर्भर होत असताना केवळ नोकरीमागे न लागता रोजगार निर्माण करणारा युवक व्हावे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले की, आज रोजगार कंत्राटदार व इतर क्षेत्रांत परप्रांतीयांचा भरणा दिसत आहे. या प्रत्येक क्षेत्रात गोमंतकीय युवक पुढे यावा हा आपला ध्यास आहे.