ईशा मृत्यू प्रकरणी न्यायालयीन
By Admin | Updated: January 3, 2015 01:34 IST2015-01-03T01:32:20+5:302015-01-03T01:34:24+5:30
पणजी : नृत्य महोत्सवात (सुपरसॉनिक पार्टी) बळी पडलेल्या ईशा मंत्री प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी केली.

ईशा मृत्यू प्रकरणी न्यायालयीन
पणजी : नृत्य महोत्सवात (सुपरसॉनिक पार्टी) बळी पडलेल्या ईशा मंत्री प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी केली. पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणी पोलीस सरकारच्या दबावाखाली वावरत असल्याचा आरोप केला.
ईशा हिचा मृत्यू पार्टीस्थळी नव्हे, तर पार्टी संपल्यानंतर झाला, असा दावा पोलीस करीत आहेत. पर्यटनमंत्र्यांनीही असाच दावा आधी केला होता. ईशाचा मृत्यू अतिमद्यप्राशनाने झाल्याचे मंत्री म्हणतात, याचाच अर्थ पोलिसांनीही हीच भूमिका घ्यावी, असे त्यांना वाटते आणि पोलीसही त्यांचीच री ओढत असल्याचा आरोप डिमेलो यांनी केला.
ईशाचा मृत्यू पार्टीत झाला असताना अजून आयोजकांची चौकशी का होत नाही. पार्टीस्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे अजून जप्त का केलेले नाहीत, असे प्रश्न त्यांनी विचारले. सरकार हे प्रकरण दडपून टाकू पाहत आहे, असे ते म्हणाले.
ईशाचा मृत्यू पार्टी चालू असताना तेथे कोसळूनच झाला आणि आयोजकांनी संगीत थांबविण्याचे साधे सौजन्यही दाखवले नाही, असे जे व्टिट निर्माता महेश भट्ट यांनी केले, त्याचाही उल्लेख केला. तिचा मृत्यू पार्टीच्या ठिकाणी झाला नसल्याचा जो दावा सरकारकडून केला जातो, तो खोटा असल्याचे ते म्हणाले.
स्थानिक आमदार नेहमी किनारी भागात ड्रग्स व्यवसाय चालतो, असे विधानसभेत निदर्शनास आणतात; परंतु वरील प्रकरणानंतर सुपरसॉनिक पार्टीत ड्रग्सचा वापर झालाच नाही, असा जो निर्वाळा त्यांनी दिलेला आहे, त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसल्याचे डिमेलो म्हणाले.
पत्रकार परिषदेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नीळकंठ हळर्णकरही उपस्थित होते. (प्रतिनिधी)