पोलिस, राजकारण्यांचीही चौकशी करा!: अमित पालेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2025 09:44 IST2025-02-22T09:43:01+5:302025-02-22T09:44:03+5:30
जुने गोवे पोलिसांकडून चौकशी.

पोलिस, राजकारण्यांचीही चौकशी करा!: अमित पालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भू-बळकाव प्रकरणातील मास्टरमाईंड सुलेमान खान याने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिस अधिकाऱ्यांचीही नावे घेतली आहेत. त्या अधिकाऱ्यांना समन्स पाठवून पोलिस त्यांची चौकशी का करीत नाहीत? वारंवार मला समन्स पाठवून आपली सतावणूक केली जात असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नेते अॅड. अमित पालेकर यांनी केला.
पालेकरांनी काल, शुक्रवारी सकाळी ११ वाजता जुने गोवे पोलिस स्थानकात हजेरी लावली, त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. जुने गोवे पोलिसांनी अॅड. पालेकरांना पाठवलेला हा चौथा समन्स आहे. अॅड. पालेकर म्हणाले की, सुलेमान याने त्याच्या व्हिडिओमध्ये गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक, पोलिस अधिकारी तसेच भाजपचे आमदार जोशुआ डिसोझा यांची नावे घेतली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून पोलिस आपली सतावणूक करीत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आपल्याला चारवेळा समन्स पाठवले. खरे तर सुलेमानने ज्यांची नावे घेतली त्यांची चौकशी करा, अशी मागणी पालेकर यांनी केली.
टॉवर लोकेशन शोधा
सुलेमान याला गोव्यात आणण्याच्या दोन ते तीन दिवस अगोदर अटक केल्याचे म्हटले जात आहे. इतके दिवस त्याला समोर का आणले नाही? सुलेमानसोबत त्यावेळी असणाऱ्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या मोबाईलचे लोकेशन व कॉल डिटेल्स शोधून काढावे, अशी मागणीही पालेकरांनी केली.
न्यायालयाकडे दाद मागणार
यापुढे समन्स बजावले तर आपण उच्च न्यायालयात धाव घेऊ. तसेच या प्रकरणाचा तपास न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली होणे गरजेचे असून सुलेमानच्या दुसऱ्या व्हिडिओचाही तपास व्हावा, असे पालेकर म्हणाले.
सुलेमान याने जेव्हा व्हिडिओ तयार करून तो जारी केला तेव्हा आपण विदेशात होतो. आपला या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही. मात्र तरी सुद्धा आपली सतावणूक केली जात आहे. या विषयावरून मुद्दामहून टार्गेट केले जात असून ज्या पोलिस अधिकाऱ्यांची व राजकारण्यांची त्याने नावे घेतली आहेत. त्यांना मात्र मोकळे सोडण्यात आले आहे. - अॅड. अमित पालेकर, आपचे नेते