interview of Art critic, Soumik Nandy Majumdar in goa | समाजहितासाठी चित्रकलेचा वापर - शौमिक नंदी मझुमदार

समाजहितासाठी चित्रकलेचा वापर - शौमिक नंदी मझुमदार

ठळक मुद्देशौमिक नंदी मझुमदार कोलकाता येथील विश्व भारती युनिव्हर्सिटी, शांतिनिकेतन येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.देशभरात चित्रकला आणि दृश्यसाक्षरता याविषयावर अनेक कार्यशाळा घेत आहेत. गेल्या एक दशकापासून ते विशेषत: मुलांसाठी चित्र रसग्रहणवर काम करत आहेत.

दुर्गाश्री सरदेशपांडे

पणजी - शौमिक नंदी मझुमदार कोलकाता येथील विश्व भारती युनिव्हर्सिटी, शांतिनिकेतन येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तेथील विद्यार्थ्यांना ते चित्रकला, इतिहास शिकवतात. गेल्या एक दशकापासून ते विशेषत: मुलांसाठी चित्र रसग्रहणवर काम करत आहेत. पश्चिम बंगाल राज्यातील अनेक शाळांत ते नि:शुल्क याविषयावर वर्ग घेतात. देशभरात चित्रकला आणि दृश्यसाक्षरता याविषयावर अनेक कार्यशाळा घेत आहेत. सध्या बालकांसाठी चित्ररसग्रहण याविषयावर असलेल्या परिषदेसाठी प्रमुख वक्ते म्हणून गोव्यात उपस्थित होते. आज चित्रकला प्रॉडक्ट न राहता समाजाच्या हितासाठी ती बनविली जात आहेत, असे त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना सांगितले.

तुम्ही आजवर लहानांसाठी तसेच ज्येष्ठांसाठी चित्ररसग्रहणचे वर्ग घेतले आहेत. दोघांनाही शिकवत असताना तुम्हाला जाणवलेल्या फरकाबाबत सांगा?

- ज्येष्ठांना जर चित्रकलेची पार्श्वभूमी असेल तर त्यांना शिकवणं सहज होतं. मात्र, तशी पार्श्वभूमी नसेल तर त्यांच्या ठरावीक विचारसरणीला बदलणे अवघड होते. नेहमी ठरावीक उत्तर शोधण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ‘आम्हाला बुवा हे आधुनिक चित्र वगैरे काही समजत नाही,’ अशी ज्येष्ठांची प्रतिक्रिया असते. लहान मुलांसोबत असं होत नाही. त्यांना कोणत्याही पार्श्वभूमीची गरज नसते. त्यांना कोणतेही चित्र दाखवा त्यांना समजते म्हणजे ते आपल्यानुसार अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय लहान मुलांना शिकवत असताना थेअरीची गरज भासत नाही. ज्येष्ठांना आधुनिक चित्र समजत नसल्यामुळे चित्रकलेच्या इतिहासाचा आधार घ्यावा लागतो.

चित्ररसग्रहण वर्ग घेण्यापूर्वी तुम्हाला काय तयारी करावी लागते?

- चित्ररसग्रहण वर्गाची तयारी वयोगटानुसार करावी लागते. त्यात वेळेवरही लक्ष द्यावे लागते. शाळेतील अधिकाऱ्यांकडून जेव्हा परवानगी मिळते तेव्हाच हा उपक्रम मी राबवू शकतो. त्यांनी दिलेल्या वेळेत मुलांसाठी एक अर्थपूर्ण वर्ग घेण्याचा मी प्रयत्न करतो. त्या अनुषंगाने काही चित्रं निवडतो. या सर्व तयारीनंतरही काहीवेळा खूप साºया गोष्टींत बदल होतो. काही वर्गांत लहान मुले दहा मिनिटांतच कंटाळतात. चित्ररसग्रहणात त्यांना रस येण्यासाठी मला नंतर अनेक प्रयत्न करावे लागतात.

तुमच्या या उपक्रमादरम्यान अनेक शाळांना तुम्ही भेटी दिल्या आहेत. पश्चिम बंगालमधील शाळेत चित्रकला शिकविण्याच्या
पद्धतीत काही बदल झाले आहेत का?

- पूर्वी चित्रकलेच्या तासात शिक्षक यायचे, काही विषय द्यायचे आणि मुले चित्रे काढायची. आता त्यांची चित्रे पेपरवरून बाहेर येऊ लागली आहेत. शाळेच्या परिसरात, भिंतीवर त्यांची चित्रे रंगू लागली आहेत. वास्तववादी, पारंपरिक तसेच वैचारिक चित्रे मुले रंगवू लागली आहेत. याशिवाय, सध्या ग्राफिक डिझायनिंग, अ‍ॅनिमेशन आदी क्षेत्रात उत्तम करिअर घडत असल्याने या अनुषंगानेदेखील काही शाळांमध्ये चित्रकलेच्या पाठ्यक्रमात बदल करण्यात आले आहेत.

वेळ आणि शाळेतील अधिकाऱ्यांच्या परवानगीवर चित्ररसग्रहणचे वर्ग अवलंबून आहेत. तुम्ही शाळेतील नियमित शिक्षक नसल्यामुळे तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते?

- चित्ररसग्रहणचे वर्ग घेण्यापूर्वी मला शाळेला प्रस्ताव पाठवावा लागतो. कधी कधी नकाराचाही सामना करावा लागतो. माझे मित्र माझी ‘प्रोपोझल एक्स्पर्ट’ म्हणून चेष्टा करतात. ‘आमच्या शाळेत तर विद्यार्थ्यांसाठी चित्रकलेचा वर्ग आम्ही ठेवला आहे. परत तुम्ही
का घेऊ इच्छितात’ असे प्रश्न विचारतात. शाळेतील चित्रकलेचे शिक्षक ‘हा कोण’ या नजरेने बघतात. नेहमीच मी या कार्यात यशस्वी होत नाही.

चित्रकला करणे आणि त्याचे रसग्रहण हे दोन भिन्न विषय आहेत हे अनेकदा त्यांना समजत नाही. काहीवेळा शाळेतील अधिकारी आनंदाने परवानगी देतात. खरं तर मी हे वर्ग नि:शुल्क घेतो; पण काहीवेळा माझा प्रवास, निवास आणि भोजन खर्च शाळेकडून मिळतो.

 

 

Web Title: interview of Art critic, Soumik Nandy Majumdar in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.