लवकरच साजरा होणार आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन - श्रीपाद नाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 13:18 IST2018-10-14T13:17:50+5:302018-10-14T13:18:45+5:30
आयुर्वेदाच्या प्रसार आणि प्रचारासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेसोबत परस्पर सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे लवकरच आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.

लवकरच साजरा होणार आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन - श्रीपाद नाईक
पणजी - आयुर्वेदाच्या प्रसार आणि प्रचारासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेसोबत परस्पर सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे लवकरच आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्यात येईल. आतापर्यंत केंद्रीय आयुष मंत्रालयाने १२ देशांसोबत परस्पर सामंजस्य करार केले आहेत. १४ देशांमध्ये आयुष विद्यापीठे कार्यरत आहेत तर ५0 देशांनी आयुर्वेद माहिती केंद्र सुरु केली आहेत, अशी माहिती केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी येथे दिली.
येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘आयुर्वेदाचे जागतिकीकरण’ या विषयावरील एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
मंत्री नाईक म्हणाले की, ‘आंतरराष्ट्रीय योग दिनाला ज्या पद्धतीने अल्पावधीतच जागतिक मान्यता मिळाली, त्याप्रमाणेच आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिनही साजरा होईल. केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या निर्मितीनंतर भारतीय उपचारपद्धतींना आंतरराष्ट्रीय स्तरावरही मान्यता मिळत आहे. जागतिक आरोग्य संघटनेसोबत आयुर्वेदाच्या प्रसार आणि प्रचारासाठी परस्पर सामंजस्य करार करण्यात आलेला असून त्यामुळे जागतिक स्तरावर भारतीय उपचारपद्धतींना मान्यता मिळत आहे आणि ती एक मोठी उपलब्धी आहे.’
महा आयुर्वेद रिसर्च अँड मेडिकल असोसिएशनने आयोजित केलेल्या परिसंवादाचे कौतुक करताना नाईक पुढे म्हणाले की, ‘अशा प्रकारच्या परिसंवादामुळे आयुर्वेद आणि इतर भारतीय उपचार पद्धतींविषयी जनजागृती होण्यात मदत होते. आयुर्वेद क्षेत्रातील व्यक्तींनी सामान्य नागरिकांपर्यंत योग्य पद्धतीने आणि माफक दरात उपचार पोहचवले पाहिजेत.’
कार्यक्रमात ‘आयुर्वेद दर्पण’ या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. महा आयुर्वेद रिसर्च अँड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ अजित राजगिरे यांनी प्रास्ताविक तर डॉ. पराग कुलकर्णी यांनी आभारप्रदर्शन केले. व्यासपीठावर गोवा विधानसभेचे सभापती डॉ प्रमोद सावंत, केंद्रीय आयुष मंत्रालयातील सल्लागार(आयुर्वेद) डॉ. डी. सी. कटोच यांची उपस्थिती होती.