बाल कल्याण समितीस चौकशीची सूचना

By Admin | Updated: September 3, 2014 01:14 IST2014-09-03T01:12:38+5:302014-09-03T01:14:57+5:30

पणजी : उत्तर गोव्यातील एका लंडनस्थित चॅरिटी होममध्ये पंधरा वर्षीय मुलीवर बलात्कार झाला असून त्यात ही मुलगी गर्भवती राहिली असल्याचे प्रकरण उघड झाले आहे.

Inquiry Notice to Child Welfare Committee | बाल कल्याण समितीस चौकशीची सूचना

बाल कल्याण समितीस चौकशीची सूचना

पणजी : उत्तर गोव्यातील एका लंडनस्थित चॅरिटी होममध्ये पंधरा वर्षीय मुलीवर बलात्कार झाला असून त्यात ही मुलगी गर्भवती राहिली असल्याचे प्रकरण उघड झाले आहे. प्रसारमाध्यमांमधून प्रकरण उजेडात येताच सरकारने या प्रकरणाची दखल घेतली असून उत्तर गोवा बाल कल्याण समिती आणि पोलिसांनाही या प्रकरणी चौकशी करण्यास सांगण्याचे ठरले आहे.
उत्तर गोव्यातील चॅरिटी होममध्ये बलात्कार झाल्यानंतर ती मुलगी दहा दिवसांची गर्भवती राहिली. चॅरिटी होमच्या कर्मचाऱ्यावरच बलात्काराचा आरोप आहे. गेल्या एप्रिलमध्ये त्यास जुनेगोवे पोलिसांनी अटक केली व लगेच सोडून दिले. एका लंडनस्थित जोडप्याकडून हे चॅरिटी होम चालविले जात होते. त्या जोडप्याने चॅरिटी होम बंद करून पळ काढला आहे. त्या जोडप्याचा व त्या होममध्ये राहणाऱ्या पंचवीस-तीस मुलांचाही पत्ता नाही. यापूर्वी त्या जोडप्यावरही काहीच कारवाई झाली नाही किंवा त्यांचा शोध घेण्याचाही प्रयत्न झाला नाही. पोलिसांनी हे प्रकरण अगदी सहजपणे घेतले. यावर प्रसारमाध्यमांनी प्रकाश टाकल्यानंतर आता राज्य सरकारच्या यंत्रणेने या विषयाची दखल घेतली आहे. उत्तर गोवा व दक्षिण गोवा अशा दोन जिल्ह्यांसाठी दोन बाल कल्याण समित्या कार्यरत आहेत. उत्तर गोवा बाल कल्याण समितीने व पोलिसांनी या एकूण प्रकरणाची सखोल चौकशी करावी व अहवाल द्यावा, असे पत्र समितीला व पोलिसांना आता पाठविले जाणार आहे. महिला व बाल कल्याण खात्याचे सचिव पी. कृष्णमूर्ती यांनी तशी भूमिका घेतली आहे. ‘स्कॅन’ या निमसरकारी संस्थेने प्रथम हा विषय पोलिसांपर्यंत पोहचविला. त्यानंतर पोलिसांनी बलात्कार प्रकरणी
मुलीच्या आईकडून तक्रार घेतली. जुनेगोवे पोलिसांनी गेल्या १५ एप्रिल रोजी एफआयआर नोंदवला. (खास प्रतिनिधी)

Web Title: Inquiry Notice to Child Welfare Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.