माध्यान्ह आहारातून काणकोणात बाधा
By Admin | Updated: June 15, 2014 01:18 IST2014-06-15T01:17:37+5:302014-06-15T01:18:39+5:30
खोतीगाव/कुंकळ्ळी : खोला पंचायतीतील गवळखोल सरकारी शाळेच्या माध्यान्ह आहारात पाल पडून विषबाधा झाल्याने सहा मुलांना बाळ्ळी येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

माध्यान्ह आहारातून काणकोणात बाधा
खोतीगाव/कुंकळ्ळी : खोला पंचायतीतील गवळखोल सरकारी शाळेच्या माध्यान्ह आहारात पाल पडून विषबाधा झाल्याने सहा मुलांना बाळ्ळी येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शनिवारी १४ जून रोजी मुलांना माध्यान्ह आहारात पावभाजी देण्यात आली. या भाजीत पाल पडल्याने भाजी विषारी झाली होती. मात्र, हे कुणाच्याही लक्षात न आल्याने मुलांनी पावभाजी खाल्ली. त्यानंतर सुजित वैलेकर व रातिया वेळीप (इयत्ता सातवी) यांना उलट्या होण्यास सुरुवात झाली, तर विदित पागी (इयत्ता सातवी), साहील पागी (इयत्ता नववी), अक्षिदा गावकर (इयत्ता सातवी), मेधा झोरारकर (इयत्ता सातवी) यांनाही त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तातडीने बाळ्ळी येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मधल्या सुट्टीत देण्यात आलेली पावभाजी खायला सुरुवात केल्यानंतर एका मुलाला भाजीत पाल सापडल्यामुळे त्याने ही गोष्ट आपल्या मित्रांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर वरील सहाही मुलांनी उलट्या करायला सुरुवात केली. शाळेच्या मुख्याध्यापिकेने व इतर शिक्षकांनी वेळ न दवडता लगेच १०८ रुग्णवाहिका आणून बाधा झालेल्या मुलांना बाळ्ळी येथील आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉ. हरीश नागरली व इतर कर्मचाऱ्यांनी या मुलांवर तातडीने उपचार केले. सर्व मुलांची प्रकृती स्थिर असून, त्यांना देखरेखीखाली एक दिवस आरोग्य केंद्रात ठेवण्यात येणार असल्याचे डॉ. नागरली यांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेची खबर मिळताच केपेचे आमदार बाबू कवळेकर यांनी विषबाधा झालेल्या मुलांची भेट घेऊन विचारपूस केली. शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व भागशिक्षणाधिकारी शारदा फळदेसाई यांनीही आरोग्य केंद्रास भेट दिली. माध्यान्ह आहार करण्याचे कंत्राट एका स्थानिक महिला मंडळाकडे असून, या संदर्भात चौकशी करण्यात येणार असल्याचे भागशिक्षणाधिकारी फळदेसाई यांनी सांगितले. पाल मिळालेली भाजी व पावाचे नमुने तपासणीसाठी अन्न व औषध खात्याकडे पाठविण्यात येणार आहेत. याबाबत मुख्याध्यापिकेने पोलिसांत तक्रार नोंद केली असून, कुंकळ्ळी पोलीस पुढील चौकशी करीत आहेत. (वार्ताहर)