महागाईने खिसा कापला!
By Admin | Updated: July 1, 2014 01:40 IST2014-07-01T01:40:33+5:302014-07-01T01:40:33+5:30
महागाईने खिसा कापला!

महागाईने खिसा कापला!
पणजी : लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘अच्छे दिन आनेवाले है...’ अशा भूलथापा देउन सत्ता मिळविल्यानंतर केंद्रातील सरकारला महागाईने महिन्याभरातच चीतपट केले आहे. जीवनावश्यक दरांच्या किमती सातत्याने वाढत असताना महागाईवर नियंत्रण आणण्यात केंद्र व राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. सोमवारी पेट्रोल व डिझेलच्या दरांत वाढ करून केंद्र सरकारने सामान्यांच्या जखमेवर मीठ चोळले, तर राज्यात गोवा डेअरीने सर्व प्रकारच्या दुधाचे दर दोन रुपयांनी वाढविल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. नारळाचे दरही वाढले असून फलोत्पादन विकास महामंडळाला कांद्यावर दिल्या जाणाऱ्या अनुदानात सरकारने चाळीस टक्क्यांवरून पंचवीस टक्क्यांपर्यंत घट केली आहे. त्यामुळे कोथिंबिरीबरोबरच कांदाही स्वयंपाकघरातून हद्दपार होण्याची शक्यता आहे.
कांद्याचा दर खुल्या बाजारात सध्या ४० रुपये प्रति किलो असा आहे. फलोत्पादन विकास महामंडळाच्या दालनांमध्ये कांदा ३२ रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. अगोदर कांद्यासाठी फलोत्पादन महामंडळास कांद्याच्या विक्रीवर सरकार चाळीस रुपयांचे अनुदान देत होते. त्यामुळे कांदा महामंडळाच्या दालनात स्वस्त वाटत होता. गेल्या फेब्रुवारीपासून सरकारने महामंडळाच्याच विनंतीवरून अनुदानाचे प्रमाण ४० टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर आणले आहे. त्यामुळे महामंडळ आता कमी दराने कांदा विकू शकत नाही. नारळाचे दर बाजारपेठांमध्ये वीस ते पंचवीस रुपये नग असा आहे. जी कोथिंबिर अगोदर दहा रुपयांना मिळत होती, त्यासाठी आता चाळीस रुपये मोजावे लागत आहेत.
(प्रतिनिधी)