पक्षात बेशिस्त खपवून घेणार नाही; प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी म्हापसा येथील बैठकीत खडसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2025 13:18 IST2025-01-23T13:17:27+5:302025-01-23T13:18:29+5:30
उत्तर गोवा पक्ष कार्यालयात बुधवारी संविधान गौरव अभियान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

पक्षात बेशिस्त खपवून घेणार नाही; प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी म्हापसा येथील बैठकीत खडसावले
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : भाजप हा शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यामुळे ही शिस्त पाळून सर्वांनी शिस्तीने वागावे. पक्ष विरोधी विधान, पक्षातील बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिला आहे.
उत्तर गोवा पक्ष कार्यालयात बुधवारी संविधान गौरव अभियान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी मंत्री निळकंठ हळर्णकर, आमदार डिलायला लोबो, आमदार प्रेमेंद्र शेट, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, माजी आमदार दयानंद सोपटे, प्रवक्ता गिरीराज पै वेर्णेकर, उत्तर गोवा अध्यक्ष दयानंद कारबोटकर, रुपेश कामत उपस्थित होते.
यावेळी गिरीराज पै, बाबू कवळेकर आदी नेत्यांनी आपले विचार यावेळी मांडले. बार्देशातील काही नेते पक्षाच्या विरोधात बोलत असल्याचे नजरेस आल्याने नाईक यांनी हा इशारा दिला. आमदारकीची स्वप्ने बाळगणाऱ्यांनी सुद्धा शिस्त बाळगावी असाही सल्ला त्यांनी दिला.
निःस्वार्थी लोकांसाठी भाजपची दारे खुली आहेत
भाजप पक्षाने २०२७ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीत पक्ष राज्यातील २७ जागा जिंकणार, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी म्हापसा येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना व्यक्त केला. त्यासाठी सर्व ४० मतदारसंघात पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. ज्यांना या पक्षाची तत्वे आवडतात, ज्यांना निःस्वार्थीपणे काम करण्याची इच्छा आहे, अशा सर्वांना पक्षाची दारे खुली आहेत. मग ती व्यक्ती कुठल्याही पक्षातील असो, असेही नाईक म्हणाले. यावेळी नाईक यांनी काँग्रेसवर टिका करताना घटनेचा गैरवापर काँग्रेस पक्षाकडून करण्यात आल्याचा आरोप केला.