भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 06:17 IST2025-10-21T06:16:10+5:302025-10-21T06:17:05+5:30
आयएनएस विक्रांत युद्धनौकेवर सशस्त्र दलांच्या जवानांशी संवाद साधताना मोदी म्हणाले की, नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांच्या जवानांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भारत हा नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर उभा आहे. नक्षलवादापासून मुक्त झालेले १००हून अधिक जिल्हे यंदा अधिक उत्साहाने दिवाळी साजरी करतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले.
गोव्याच्या किनाऱ्याजवळ आयएनएस विक्रांत युद्धनौकेवर सशस्त्र दलांच्या जवानांशी संवाद साधताना मोदी म्हणाले की, नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांच्या जवानांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळे दशकभरापूर्वी १२५ जिल्ह्यांत असलेला नक्षलवाद आता ११ जिल्ह्यांपुरता उरला आहे. आता देश नक्षलवाद्यांच्या दहशतीपासून मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे. जीएसटी बचत उत्सवामुळे खरेदी, विक्रीत मोठी वाढ होत आहे. जेथे नक्षलवाद्यांनी राज्यघटनेचा उच्चारही करू दिला नव्हता तिथे आता स्वदेशीचा मंत्र घुमतो आहे.
‘पोलिस दलांचे योगदान मोलाचे जवानांच्या त्यागातूनच यश’
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, नक्षलवादाविरुद्ध लढणाऱ्या पोलिस दलांचे विशेष कौतुक आहे. या दलांतील अनेक जवानांनी आपले अवयव गमावले, काही जण व्हीलचेअरवरून उठू शकत नाहीत. जवानांच्या मनात जागृत असलेल्या देशभक्तीची धार अजिबात कमी झालेली नाही. त्यांच्या त्यागामुळेच यश मिळाले आहे.