तारांकित हॉटेलांना वाढीव एफएआर

By Admin | Updated: January 30, 2015 01:26 IST2015-01-30T01:20:42+5:302015-01-30T01:26:18+5:30

२0 टक्के अतिरिक्त चटई निर्देशांक : सरकारच्या प्रस्तावाने खळबळ; हॉटेल लॉबीसाठी खटाटोप होत असल्याचा आरोप

Increased FAR to starred hotels | तारांकित हॉटेलांना वाढीव एफएआर

तारांकित हॉटेलांना वाढीव एफएआर

पणजी : चार आणि पंच तारांकित हॉटेलांना बांधकामासाठी अतिरिक्त २0 टक्के चटई निर्देशांक (एफएआर) वाढवून देण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी नगर नियोजन खात्याने २0१0च्या गोवा भू विकास व बांधकाम नियमांमध्ये दुरुस्ती सुचविणाऱ्या मसुद्याची अधिसूचना जारी केली असून याबाबतीत जनतेकडून ३0 दिवसांच्या आत हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. नियमात सुचविलेल्या दुरुस्त्यांमुळे खळबळ
माजली आहे. हॉटेल लॉबीच्या सोयीसाठी हा खटाटोप असल्याचा आरोप सरकारवर होत आहे.
मुख्य नगर नियोजक एस. टी. पुत्तुराजू यांच्या सहीने जारी झालेल्या या मसुद्यात २0१0च्या भू विकास व बांधकाम नियम ६ अ ४मध्ये दुरुस्ती करताना नवे कलम घुसडण्यात आले असून या अन्वये चार आणि पंच तारांकित हॉटेलांना नगर नियोजन सचिवांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समितीच्या शिफारशीवर बांधकामासाठी अतिरिक्त २0 टक्के एफएआर देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच बांधकामाची उंची, सेट बॅक (बांधकामाच्या बाबतीत ठेवायचे अंतर) याबाबतीतही शिथिलता देण्याची तरतूद आहे.
नगर नियोजन सचिवांच्या अध्यक्षतेखालील ही समिती पाच सदस्यीय असेल आणि त्यात टुर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशनचे अध्यक्ष, पर्यटन खात्याचे संचालक, अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र या विषयातील सरकारनियुक्त तज्ज्ञ प्रतिनिधी आणि मुख्य नगर नियोजक यांचा सदस्य म्हणून समावेश असेल.
चार व त्यापुढील तारांकित हॉटेलांना वरील सवलत देताना शैक्षणिक संस्था तसेच आदिवासींच्या घरांनाही एफएआरच्या बाबतीत शिथिलता देण्याची तरतूद आहे.
कृषी प्रकल्पांनाही एफएआर सवलत
कृषी प्रकल्पांसाठीही एफएआरमध्ये वाढ करण्याची तरतूद या मसुद्यात
आहे. त्यानुसार फलोत्पादन आणि पुष्पोत्पादनासाठी किमान ५00 चौरस मीटर आणि कमाल ४ हजार चौरस मीटर जमिनीत प्लास्टिक किंवा लाकडी बांधकामासाठी भूखंडाच्या ५0 टक्क्यांपर्यंत, कृषिविषयक ग्रेडिंग व पॅकिंग युनिटसाठी हंगामी किंवा कायम बांधकामासाठी ५ टक्के, प्राथमिक प्रक्रिया, तसेच प्री कुलिंग युनिटसाठी किमान २00 चौरस मीटर भूखंडासाठी ५ टक्के, शीतगृहासाठी १५ टक्क्यांपर्यंत, अळंबी उत्पादन युनिटसाठी ३0 टक्क्यांपर्यंत, पंप हाउससाठी ३0 चौरस मीटरपर्यंत तर डेअरी, पोल्ट्री, डुक्कर पालनासाठी भूखंडाच्या २0 टक्क्यांपर्यंत एफएआर देण्याची तरतूद आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Increased FAR to starred hotels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.