मराठी राजभाषेसाठी महामेळावे घेऊन ताकद वाढवा: सुभाष वेलिंगकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 12:43 IST2025-09-15T12:42:21+5:302025-09-15T12:43:03+5:30
मंगेशी येथे कार्यशाळेला प्रतिसाद

मराठी राजभाषेसाठी महामेळावे घेऊन ताकद वाढवा: सुभाष वेलिंगकर
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : 'मराठी ही राज्यभाषा झालीच पाहिजे यासाठी सुरू असलेल्या मोहिमेचे यश दृष्टिक्षेपात येत आहे. मराठीसाठी तन-मन-धन लावून काम करणारे कार्यकर्ते तयार झाले आहेत. राज्यात प्रखंड समिती, तालुका समिती, ग्राम समिती, युवा समिती, मातृ शक्ती समितीच्या माध्यमातून जोरदार काम सुरू आहे. या सर्व शक्तींच्या माध्यमातून मराठीप्रेमींचे महामेळावे राज्यभर सुरूच राहतील. मातृशक्ती व युवा शक्तीचे प्रत्येकी पाच हजार उपस्थितीतांचे महामेळावे घडवून आणून ताकद निर्माण करा, असे आवाहन मराठी राजभाषा निर्धार समितीचे समन्वयक सुभाष वेलिंगकर यांनी केले आहे.
मंगेशी येथील वागळे हायस्कूलमध्ये काल, रविवारी मराठी निर्धार समितीच्या वेगवेगळ्या समितीच्या कार्यशाळा झाल्या. उपस्थित समिती सदस्यांना मार्गदर्शन करताना वेलिंगकर बोलत होते. ऑक्टोबर, नोहेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये चळवळ नक्की कशी चालेल, यासंबंधी या बैठकीत चर्चा करण्यात आली.
वेलिंगकर म्हणाले की, मराठी राजभाषा झालीच पाहिजे हा संकल्प सिद्धी मंत्र घेऊन या बैठकीचे आयोजन करण्यात आले. युवा व महिला शक्तीला कार्यरत करण्यासाठीचे कार्यक्रम या बैठकीत घेण्यात आले. संपूर्ण १८ प्रखंडमध्ये सुरुवातीच्या काळात महिला व युवा मेळावे घेण्यात येतील. २० ठिकाणी मातृशक्ती मेळावे घेण्यात येतील. त्या सर्व मेळाव्यांना जास्तीत जास्त लोक जमतील त्याचे नियोजन करण्यासाठीच ही मंगेशीची बैठक आहे.
यावेळी वेलिंगकर म्हणाले, की आता आळस करून चालणार नाही. लढ्याची व्याप्ती, गती अशाच जोमाने पुढे गेली पाहिजे. कुठेही मरगळ आणू देऊ नका. आमचा लढा आता तळागाळापर्यंत जायला हवा. तळागाळातील प्रत्येक व्यक्ती या लढ्यात सहभागी झाली पाहिजे, त्या दृष्टीने प्रयत्न करा. १८ प्रखंडाच्या माध्यमातून मेळावे घ्या. त्या मेळाव्याच्या माध्यमातून तुमची ताकद निर्माण करा.
लढ्याने व्यापक स्वरूप घेतले : गो.रा. ढवळीकर
मार्गदर्शक गो.रा. ढवळीकर म्हणाले, की अनेक वर्षे प्राथमिक स्तरावर जे काम चालू होते, त्या कष्टाला फळ येताना आता दिसू लागले आहे. मोठ्या संख्येने युवा व महिला आज या चळवळीमध्ये सहभाग घेत आहेत. सुरुवातीपासून जी मंडळी या संघर्षामध्ये कार्यरत होती, त्यांच्या कार्याला आता पोच पावती मिळताना दिसत आहे. या लढ्याने आता व्यापक स्वरूप घेतलेले आहे. संघटितपणे आज लढा पुढे जात आहे. मराठीप्रेमींची एक मोठी शक्ती तयार झालेली आहे. यात सर्वांना सहभागी करून घेतले गेले तरच आपल्या लढ्याला यश येईल.