नमो अॅपच्या धर्तीवर लवकरच गोव्यात ‘सीएम ॲप’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 13:50 IST2023-02-08T13:50:19+5:302023-02-08T13:50:56+5:30
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या नमो अॅपच्या धर्तीवर हे अॅप असेल, असे प्रमोद सावंत यांनी स्वतःच स्पष्ट केले.

नमो अॅपच्या धर्तीवर लवकरच गोव्यात ‘सीएम ॲप’
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : मंत्री, आमदार, अधिकारी आदींना त्यांचे काम अपडेट करता येईल आणि इतरांना त्यांनी केलेल्या कामाची माहिती रिअल टाइममध्ये मिळवता येईल, असे ॲप मुख्यमंत्री आता आणणार आहेत.
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या नमो अॅपच्या धर्तीवर हे अॅप असेल, असे प्रमोद सावंत यांनी स्वतःच स्पष्ट केले. येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात तालुका नोडल अधिकारी आणि स्वयंपूर्ण मित्र' यांच्या मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. सावंत म्हणाले की, 'सरकार स्वयंपूर्ण अॅप किंवा सीएम अॅप विकसित करण्याचा विचार करत आहे. मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार आणि अधिकारी त्यांनी केलेल्या कामाची माहिती अपडेट करतील.
सरकारने योजना तळागाळात पोचवण्यासाठी तसेच अंत्योदय तत्त्वावर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी नेमलेले स्वयंपूर्ण मित्रही अॅपवर त्यांचे नित्य उपक्रम अपडेट करू शकतात. यामुळे सर्व स्वयंपूर्ण मित्रांना विविध पंचायतींमध्ये अवलंबल्या जाणाऱ्या सर्वोत्तम पद्धती जाणून घेण्यास आणि त्यांचा अवलंब करण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
बोनस वाटप
सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शंभर स्वयंपूर्ण मित्रांना वार्षिक कामगिरीचा आढावा घेऊन बोनस देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. सावंत यांनी केंद्रीय एमएसएमई मंत्रालयाच्या पुढाकाराने पारंपरिक उद्योगांच्या पुनर्जन्मासाठी निधी योजनेअंतर्गत सर्व बाराही तालुक्यांमध्ये क्लस्टर्स स्थापन करण्याच्या सरकारच्या योजनेचीही घोषणा या प्रसंगी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"