सरस महिलांसाठी महत्त्वपूर्ण: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; बँकेच्या माध्यमातून ३३१.९९ कोटी रुपयांचे वाटप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 12:16 IST2025-03-08T12:15:02+5:302025-03-08T12:16:07+5:30
आतापर्यंत याच सरस बाजाराच्या माध्यमातून राज्यातील अनेक महिला लखपती बनल्या आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

सरस महिलांसाठी महत्त्वपूर्ण: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; बँकेच्या माध्यमातून ३३१.९९ कोटी रुपयांचे वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'स्वयंपूर्ण गोवा सरस' या बाजाराला खुप महत्व आहे. या बाजाराच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेली उत्पादनांची विक्री करण्यास एक व्यासपीठ मिळत असते. संस्कृती आणि व्यापाराचे आगळे वेगळे दर्शन येथे घडत असते. आतापर्यंत याच सरस बाजाराच्या माध्यमातून राज्यातील अनेक महिला लखपती बनल्या आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
कला अकादमीच्या दर्या संगमवर आयोजित स्वयंपूर्ण गोवा सरस या बाजारच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत ग्रामीण विकास मंत्री गोविंद गावडे, खात्याच्या संचालिका दीपाली नाईक, प्रेमराज शिरोडकर उपस्थित होते. राज्यातील अर्थव्यावस्थेत स्वयंसेवी गटांचा मोठा वाटा आहे. स्वयंसेवी गटांमध्ये ग्रामीण भागातील महिलांचा जास्त समावेश असतो. त्यांचा होणारा विकास हा खूप थक्क करणारा आहे. आम्ही त्यांना कमी व्याजासह कर्ज देत असतो, पण आपल्या कष्टाने त्या मोठ्या झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर २५ ते ३० महिलांचा सत्कार केला आहे. तसेच कमी व्याज दराने १० महिलांना ई-बाईक देखील व्यावसाय करण्यासाठी प्रदान केल्या आहेत, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
महिलांमध्ये व्यावसायिक शक्ती
ग्रामीण विकास खात्याकडे सुमारे ३२०० स्वयंसेवी गटांची नोंदणी आहे. या स्वयंसेवी गटांच्या माध्यमातून ४२ हजार महिला खात्याशी संलग्न आहेत. क्लस्टर स्तरावरील १८ फेडरशनचे नेतृत्व गोमंतकीय महिला करत आहेत. आतापर्यंत स्वयंसेवी गटांना ८.२८ लाख रुपये वाटप करण्यात आले आहे. स्टार्ट अप फंड म्हणून केवळ ग्रामीण भागातील संघटनांना १.३८ लाख रुपये दिले आहे. तर समुदाय गुंतवणूक म्हणून २१०५ लाख रुपये आतापर्यंत दिले आहे. एवढेच नाही तर बँकच्या माध्यमातून महिला व्यावसायिकांना ३३१.९९ कोटी रुपये प्रदान केले आहे. त्यांनी बऱ्यापैकी हे पैसे आपला फायदा करुन परत केले आहे, यातून महिला व्यावसायिकांची शक्ती दिसून येते, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
खात्याने नवे लक्ष्य ठेवावे
ग्रामीण विकास खात्याने ३३८ कोटी रुपयांचा लक्ष्य पूर्ण केले आहे. त्यामुळे आता त्यांनी नवीन लक्ष्य निश्चित करावे. सध्या जे स्वयंसेवी गट आहेत, त्यांना तीन हजारांवरुन २०२७पर्यंत पाच हजार करावे. तसेच खात्याशी सलग्न ४२ हजार महिलांचा आकडा तो वाढवून एक लाख पर्यंत करावा. महिलांची प्रगती पाहता हे शक्य आहे, असे डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले. सोबत उद्योजक बनण्यासाठी सराकरा करत असलेल्या योजानांची माहिती दिली.