लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पंजाब सरकारने तेथील नागरिकांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री सेहत आरोग्य विमा योजनेच्या धर्तीवर प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी १० लाख रुपयांपर्यंत मोफत आणि कॅशलेस वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणारी योजना गोवा सरकारनेही सुरू करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पत्रकार परिषदेत या योजनेची माहिती दिली.
मुख्यमंत्री मान म्हणाले की, 'या योजनेत अडीच हजार प्रकारच्या आजारांवर उपचारांची सोय करण्यात आली असून पाच-सहा दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या योजनेत आतापर्यंत दहा हजार जणांची नोंदणी झालेली आहे. पंजाबात एकूण ६५ लाख कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार आहे.'
भगवंत मान म्हणाले की, 'भाजप सरकारला औषधे खरेदीत नव्हे तर आमदार खरेदीमध्ये रस आहे. पैसे फेकून आमदार विकत घेतले जातात आणि जो आमदार आमिषांना बळी पडत नाही त्याच्यामागे ईडी किंवा अन्य चौकशी यंत्रणा लावल्या जातात. भाजपला जनतेच्या आरोग्याचे सोयरसूतक नाही. आम आदमी पक्ष सामान्यांसाठी आहे.'
पक्षाचे गोवा प्रमुख वाल्मिकी नायक म्हणाले की, 'गोवा मॉडेल ऑफ हेल्थ केअर'चा असा बडेजाव आरोग्यमंत्री नेहमीच मारतात. परंतु प्रत्यक्षात येथे कर्करोगाचे निदान करण्यासाठी लागणारी तीन कोटींचे साधे पॅट स्कॅन मशीनदेखील उपलब्ध नाही. हे सरकार शपथविधी सोहळ्यावर ६ कोटी रुपये खर्च करते. परंतु हे मशीन खरेदी करण्याचे मात्र भान दाखवत नाही. महालेखापालाच्या अहवालानुसार गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ५१ टक्के डॉक्टरांची कमतरता आहे. दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेखाली केवळ ४५० आजार कव्हर होतात. मोतीबिंदूसारखी साधी शस्त्रक्रिया या योजनेत बसत नाही, हे दुर्दैव आहे.'
'...तर गोमंतकीयांना ही योजना लागू करू'
दरम्यान, गोव्यात २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष सत्तेवर आल्यास लोकांना १० लाख रुपयांपर्यंतची आरोग्य विमा योजना लागू केली जाईल, असे पक्षाच्या गोवा प्रभारी आतिशी मार्लेना यांनी या पत्रकार परिषदेत जाहीर केले.
आरोग्य सुविधांना प्राधान्य
भगवंत मान म्हणाले की, 'पंजाबात आम्ही मोठ्या प्रमाणात क्लिनिक्स सुरू केलीत. तेथे मधुमेह, रक्ताच्या चाचण्या घेतल्या जातात. गट स्तरावर तसेच जिल्हास्तरावर इस्पितळे उघडली. आता वरील योजनेमुळे पंजाबातील जनतेला मी पूर्णपणे सुरक्षा कवच दिले आहे. पंजाबमधील लोक सैन्यदलामध्ये तसेच खेळांमध्ये तरबेज आहेत. त्यांचे आरोग्य तंदुरुस्त राहायला हवे. त्याला आमचे प्राधान्य आहे.'
स्वतंत्र देखरेख यंत्रणा
भगवंत मान म्हणाले की, 'वरील योजनेत कोणताही घोटाळा होऊ नये. खोट्या रुग्णांच्या नावाखाली इस्पितळांनी व डॉक्टरांनी पैसे लाटू नयेत, यासाठी देखरेख यंत्रणा ठेवली आहे. असे गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाई केली जाईल. डॉक्टरांना निलंबितही केले जाऊ शकते.'
Web Summary : Bhagwant Mann urges Goa to launch a free cashless healthcare scheme like Punjab's, offering ₹10 lakh coverage. AAP promises to implement it if elected in 2027, criticizing Goa's existing health infrastructure and BJP's priorities. Focus is on accessible healthcare and preventing fraud within the scheme.
Web Summary : भगवंत मान ने गोवा से पंजाब की तरह मुफ्त कैशलेस स्वास्थ्य योजना शुरू करने का आग्रह किया, जिसमें ₹10 लाख का कवरेज हो। आप ने 2027 में निर्वाचित होने पर इसे लागू करने का वादा किया, गोवा के मौजूदा स्वास्थ्य ढांचे और भाजपा की प्राथमिकताओं की आलोचना की। योजना में सुलभ स्वास्थ्य सेवा और धोखाधड़ी की रोकथाम पर ध्यान केंद्रित किया गया है।