म्हादई अभयारण्यात बेकायदा वृक्षतोड; आधीच वणव्याच्या आगीमुळे वन्यजीवांचा लक्षणीय ऱ्हास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 14:27 IST2024-01-21T14:27:08+5:302024-01-21T14:27:17+5:30
या प्रकरणी चौकशीची मागणी केली जात आहे

म्हादई अभयारण्यात बेकायदा वृक्षतोड; आधीच वणव्याच्या आगीमुळे वन्यजीवांचा लक्षणीय ऱ्हास
पणजी: कर्नाटकने पाणी वळवल्याने आधीच ‘म्हादई’ला लागलेले ग्रहण तसेच गेल्या वर्षी पेटलेल्या वणव्यांपाठोपाठ आता म्हादई अभयारण्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा वृक्षसंहार होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. म्हादई अभयारण्यात डोंगरावर गेलेल्या ट्रॅकर्सच्या एका गटाने ही झाडे तोडल्याचे पहिल्यांदा पाहिले. गेल्या आगीत म्हादईच्या जंगलातील झाडे मोठ्या प्रमाणात नष्ट झाली होती.
आगीमुळे म्हादई अभयारण्यात वन्यजीवांचा लक्षणीय ऱ्हास झाला आहे. अलिकडच्या वर्षांत म्हादई अभयारण्यामध्ये अतिक्रमण आणि अवैध वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. अभयारण्याजवळील काजू बागायती वाढवण्यासाठी वृक्षतोड केली जाते, अशी चर्चा आहे. वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाला बाधा पोचली आहे. गवेरेडे, रानडुक्कर तसेच इतर वन्यप्राण्यांना झळ पोचली.
यापूर्वी २०१९ सालीही वृक्षतोडीचे असेच बेकायदा प्रकार निदर्शनास आले होते उपवनसंरक्षक (वन्यजीव) यांनी त्यावेळी काहीजणांना अटक करुन जंगलतोड थांबवली. मात्र, आता वृक्षतोड पुन्हा सुरू झाली आहे. या प्रकरणी चौकशीची मागणी केली जात आहे.