आयआयटीचे फर्मागुडीत वेलकमच, यापूर्वी स्व. मनोहर पर्रीकरांना दिला होता पर्याय: सुदिन ढवळीकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 12:30 IST2025-09-25T12:29:46+5:302025-09-25T12:30:37+5:30
पाच लाख चौरस मीटर क्षेत्रात आयआयटी उभी करणे शक्य, प्रगती साधणारा प्रकल्प गोव्यात हवाच

आयआयटीचे फर्मागुडीत वेलकमच, यापूर्वी स्व. मनोहर पर्रीकरांना दिला होता पर्याय: सुदिन ढवळीकर
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : फर्मागुडी येथे शैक्षणिक हबने यापूर्वी आकार घेतलेला आहे. अजूनही एक चांगले विस्तारित शैक्षणिक हब निर्माण करण्याची क्षमता फर्मागुडी येथे निश्चितच आहे. सद्यःस्थितीत दहा लाख चौरस मीटर जमीन गोव्यात मिळणे तशी कठीणच आहे. तेव्हा आयआयटीसारखा प्रकल्प फर्मागुडी येथे यावा, अशी विनंती मी तेव्हासुद्धा केली होती व आताही मी त्या मतावर ठाम आहे, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. आयआयटीच्या विषयावर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
आयआयटीसारखा शैक्षणिक प्रगती साधणारा प्रकल्प गोव्यात यावा, असे स्व. मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न होते. यासंदर्भात त्यांनी माझ्याकडे ज्यावेळी संवाद साधला, त्यावेळी मी त्यांना फर्मागुडी येथे पर्याय दिला होता. एनआयटीचासुद्धा विचार तेव्हाच सुरू झाला होता. मुख्य म्हणजे या माझ्या तत्कालीन प्रस्तावावर त्यावेळी जमिनीचे सर्वेक्षणही पूर्ण करण्यात आले होते. कालांतराने एनआयटी तिकडे उभी झाली, असे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.
आज फर्मागुडी येथे सुमारे अकरा लाख चौरस मीटर जमीन आहे. पाच लाख चौरस मीटर जमिनीत आयआयटी उभी करणे शक्य आहे. तिथे दहा लाख एफेआर वापरून चांगल्या इमारती उभ्या करणे शक्य आहे. गरज पडल्यास अतिरिक्त जमीनसुध्दा घेणे शक्य आहे, असे मंत्री ढवळीकर म्हणाले. कोडार आयआयटी विषयावर मंत्री ढवळीकर म्हणाले, त्या विषयावर मी आतातरी भाष्य करणार नाही. शेवटी हा निर्णय सरकारने घ्यायचा आहे.
'देवा राखणदारा! आता गावाला तूच वाचव'
कोडार व बेतोडा येथे होऊ घातलेल्या आयआयटी प्रकल्पाविरोधात कोडारवासीय आक्रमक झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प या भागात नकोच, अशा भूमिकेबर ते ठाम आहेत. काल बुधवारी कसमशेळ बेतोडा येथील ग्रामस्थांनी देव लंगडेश्वराला साकडे घातले. देवा राखणदारा आता गावाची रक्षा तूच कर असे गा-हाणे यावेळी घालण्यात आले. ज्ञानेश्वर खांडेपारकर यांनी गा-हाणे घालताना हा प्रकल्प ज्याने कोणी येथे आणला त्याला हा प्रकल्प येथून दूर घेऊन जाण्याची सुबुद्धी दे, अशी मागणी यावेळी केली.
ज्ञानेश्वर खांडेपारकर म्हणाले की, ग्रामस्थांनी ८०० सह्यांचे निवेदन पंचायतीला दिले आहे व २८ सप्टेंबर रोजी या विषयावरून खास ग्रामसभा घेण्याचे आवाहन केले आहे. पंचायत सचिवांनी यासंबंधी तयारी दाखवली आहे. सरपंच मात्र अजून त्या नोटिसीवर सही करायला तयार नाहीत. त्यामुळे सरपंचांनाही सदर ग्रामसभा घेण्यासाठी बुद्धी दे, अशी मागणी देवाकडे केली. आयआयटीला विरोध करण्यासाठी बेतोडा व कोडार येथील नागरिक एकवटले आहेत. त्यांची ही एकजूट अशीच कायम राहावी, अशी मागणीही यावेळी केली.
ग्रामसभा घ्या, अन्यथा...
श्री देव लंगडेश्वराला गा-हाणे घातल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना देवेंद्र च्यारी म्हणाले की, सह्यांचे निवेदन देऊन सुद्धा सरपंच ग्रामसभा घेण्यासाठी टाळाटाळ करत आहे हे चुकीचे आहे. चार दिवसांच्या आत सदर ग्रामसभा झाली नाही, तर सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोरच आंदोलन करतील. सरपंचांना ग्रामसभा घेण्यासाठी भीती वाटत असेल, तर त्यांनी उपसरपंचांच्या माध्यमातून सदर ग्रामसभा घ्यावी. प्रसंगी लोक सरपंचांच्या घरी सुद्धा ठिय्या आंदोलन करतील.
नोटीसही तयार पण...
यासंदर्भात बोलताना ज्ञानेश्वर खांडेपारकर म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या अंतर्गत बैठकीमध्ये ग्रामसभा घेण्याविषयी निर्णय झालेला आहे. काही पंचसदस्यांनी सकारात्मकता दाखवली आहे. पंचायत सचिवांनी या संबंधी नोटीसही तयार करून ठेवली आहे. परंतु, सरपंचावर कुणाचा तरी दबाव असावा. खरेतर अशा प्रसंगी सरपंचांनी ग्रामस्थांबरोबर उभे राहायला हवे. जे काही मतभेद असतील ते विसरून आज सगळ्यांनी एक व्हायला हवे.