‘बेटर मॅन’ या चित्रपटाने इफ्फीची सुरुवात
By किशोर कुबल | Updated: November 20, 2024 23:15 IST2024-11-20T23:13:49+5:302024-11-20T23:15:33+5:30
सिनेप्रेमींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या भव्य उद्घाटन समारंभात सिनेविश्वातील काही दिग्गजांचा सत्कार करण्यात आला .

‘बेटर मॅन’ या चित्रपटाने इफ्फीची सुरुवात
पणजी : गोव्यात ५५ व्या इफ्फीची सुरुवात ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते मायकेल ग्रेसी यांच्या ‘बेटर मॅन’ या चित्रपटाने झाली.
सिनेप्रेमींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या भव्य उद्घाटन समारंभात सिनेविश्वातील काही दिग्गजांचा सत्कार करण्यात आला . चित्रपट क्षेत्रातील दिग्गज सुभाष घई, चिदानंद नाईक, बोमन इराणी, आर के सेल्वामणी, जयदीप अहलावत, जयम रवी, ईशारी गणेश, आर. सरथ कुमार, प्रणिता सुभाष, जॅकी भगनानी, रकुल प्रीत सिंग, रणदीप हुडा आणि नित्या मेनन यांना चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल गौरवण्यात आले. भारतीय चित्रपटसृष्टीतील चार दिग्गज राज कपूर, तपन सिन्हा, अक्किनेनी नागेश्वर राव आणि मोहम्मद रफी यांच्यावरील विशेष तिकिटाचे अनावरण करण्यात आले.
राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू; महोत्सवाचे संचालक शेखर कपूर; सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून जोशी; आणि प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर हेही मान्यवरांमध्ये उपस्थित होते. या प्रसंगी श्री श्री रविशंकर म्हणाले, "प्रत्येक जीवन हे एका चित्रपटासारखे आहे. मी लोकांना भेटलो आणि त्यांच्या कथा ऐकल्या. संपूर्ण जग हे कथा सांगण्याचे व्यासपीठ आहे. आपल्या देशात प्राचीन काळापासून देव देखील काही प्रकारे मनोरंजन आणि कलेशी जोडलेले आहेत, जसे भगवान शिव डमरू वाजवतात, देवी सरस्वती वीणा वाजवतात, भगवान कृष्ण बासरी वाजवतात. भारतीय संस्कृती ही मनोरंजनात गुंतलेली आहे आणि त्यामुळेच आपल्याला आनंदी जीवन जगता येते.'
इफ्फीमध्ये यंदा राज कपूर, तपन सिन्हा, अक्किनेनी नागेश्वर राव (एएनआर) आणि मोहम्मद रफी यांच्या चित्रपटातील महान कारकिर्दीला अभिवादन करण्यात येणार आहे. यामध्ये त्यांच्या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येईल तसेच संवादात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.
या सोहळ्यात ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ अर्थात उद्याचे सर्जनशील कलावंत या उपक्रमाविषयी देखील घोषणा करण्यात आली.