...तर गोव्याचे मुख्यमंत्रिपद फ्रान्सिस किंवा पार्सेकरांना
By Admin | Updated: May 18, 2014 00:35 IST2014-05-18T00:35:00+5:302014-05-18T00:35:21+5:30
...तर गोव्याचे मुख्यमंत्रिपद फ्रान्सिस किंवा पार्सेकरांना

...तर गोव्याचे मुख्यमंत्रिपद फ्रान्सिस किंवा पार्सेकरांना
सदगुरू पाटील - पणजी भविष्यात मोदी सरकारमध्ये मंत्रिपद स्वीकारण्यासाठी मनोहर पर्रीकर हे दिल्लीला गेलेच, तर गोव्यात भाजप सरकारमध्ये मुख्यंमत्रिपदाची धुरा कोण सांभाळील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राजकीय गोटात त्याविषयी बरीच चर्चा सुरू असून, पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत भावी मुख्यमंत्री म्हणून म्हापशाचे आमदार असलेले उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा किंवा आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनाच संधी मिळू शकते, असे भाजपमधील काही पदाधिकार्यांचे मत आहे. आपण गोव्यातच राहाणार असून आपण केंद्रीय राजकारणात जाणार नाही, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. आपल्याला दिल्लीला जाण्यात रस नाही; पण पक्षाने एखादी अतिरिक्त जबाबदारी दिली, तर ती आपण स्वीकारीन, असे विधान मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर केले. पर्रीकर यांचा विचार राष्ट्रीय भाजपाकडून भावी केंद्रीय मंत्री म्हणून केला जात आहे, अशी वृत्ते राष्ट्रीय स्तरावरून आता नव्याने येऊ लागली आहेत. भाजपला पूर्ण बहुमत मिळाल्याने आणि केंद्रात अतिशय स्थिर असे सरकार स्थापन होणार असल्याने त्या सरकारच्या मंत्रिमंडळात पर्रीकर यांचा समावेश केला जाऊ शकतो, असे मानणारे अजूनही अनेक राजकीय विश्लेषक आहेत. काही राजकारण्यांनाही तसेच वाटते. गुजरातचे मुख्यमंत्रिपद सोडून देऊन नरेंद्र मोदी आता पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. त्याचप्रमाणे भविष्यात जर पर्रीकरांनी केंद्रीय मंत्रिपद स्वीकारलेच, तर गोव्यात मुख्यमंत्रिपदाची धुरा कुणाकडे येईल, या प्रश्नावर खल होत आहे. वेळ आलीच, तर उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांचा विचार मुख्यमंत्री म्हणून भाजपकडून प्रथम केला जाईल, असे काही भाजप आमदारांनाही वाटते. तसे केल्याने ख्रिस्ती धर्मीय नेत्यास आम्ही मुख्यमंत्री केले, असे सांगण्याचा अधिकार भाजपला प्राप्त होईल व ख्रिस्ती धर्मीय मतदारांनाही ते सुखावणारे ठरेल. डिसोझा हे पूर्वी मंत्री होते, त्यांना नंतर अचानक उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले. डिसोझा यांच्यानंतर अरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नावाचा विचार भावी मुख्यमंत्री म्हणून केला जात आहे. पार्सेकर हे भाजपचे ज्येष्ठ नेते असल्याने व ते भाजपच्या कोअर टीमधील असल्याने त्यांच्या नावाची चर्चा आहे.