उन्हात बसून उपोषण केल्यास काळे व्हाल - गोव्याचे मुख्यमंत्री
By Admin | Updated: April 1, 2015 11:49 IST2015-04-01T11:48:10+5:302015-04-01T11:49:38+5:30
उन्हात बसून उपोषण केल्यास तुम्ही काळे व्हाल व तुम्हाला लग्नासाठी मुलगा शोधण्यात अडथळे येतील त्यामुळे तुम्ही उपोषण करु नका असा अजब सल्ला पारसेकर यांनी दिला आहे.
उन्हात बसून उपोषण केल्यास काळे व्हाल - गोव्याचे मुख्यमंत्री
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १ - आंदोलन करणा-या नर्सना गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांनी वादग्रस्त सल्ला दिला आहे. उन्हात बसून उपोषण केल्यास तुम्ही काळे व्हाल व तुम्हाला लग्नासाठी मुलगा शोधण्यात अडथळे येतील त्यामुळे तुम्ही उपोषण करु नका असा अजब सल्ला पारसेकर यांनी दिला आहे. मात्र पारसेकर यांनी असा कोणताही सल्ला दिलाच नाही असे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
गोव्यातील १०८ या रुग्णवाहिका सेवेसाठी काम करणा-या नर्स (परिचारीका) गेल्या काही दिवसांपासून उपोषणावर बसल्या आहेत. १०८ ही रुग्णवाहिका सेवा गोवा सरकारच्या अंतर्गत येत असली ती सेवा एका खासगी कंपनीमार्फत चालवली जात आहे. संबंधीत कंपनीच्या अनागोंदी कारभाराविरोधात या नर्सनी आंदोलन छेडले आहे. मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्या नर्सचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्याची भेट घेण्याचे प्रयत्न करत आहे. हे शिष्टमंडळ जिथे मुख्यमंत्री जातील तिथे पोहोचतात. या शिष्टमंडळाशी संवाद साधताना मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांनी उन्हात बसून आंदोलन केल्यास काळे व्हालं असे सांगत त्यांना आंदोलन न करण्याचा सल्ला दिला. मुख्यमंत्र्यांना आमच्या आरोग्याची ऐवढी काळजी असेल तर त्यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी प्रतिक्रिया अनुषा सामंत या नर्सने दिली.