खाप्रेश्वर देवाची मूर्ती पहाटेच्या अंधारात हटवली; उड्डाणपुलासाठी पर्वरीतील मंदिर केले जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2025 11:40 IST2025-03-04T11:37:51+5:302025-03-04T11:40:16+5:30
पर्वरी येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी खाप्रेश्वर देवाचे मंदिर आणि वटवृक्ष हटविण्यावरून वातावरण तंग झाले होते. मात्र, पहाटेच्या सुमारास मोठ्या पोलिस बंदोबस्तात खाप्रेश्वर देवाची मूर्ती व वटवृक्ष हटविण्यात आला.

खाप्रेश्वर देवाची मूर्ती पहाटेच्या अंधारात हटवली; उड्डाणपुलासाठी पर्वरीतील मंदिर केले जमीनदोस्त
लोकमत न्यूज नेटवर्क, पर्वरी: पर्वरी येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी खाप्रेश्वर देवाचे मंदिर आणि वटवृक्ष हटविण्यावरून काल, रविवारी दिवसभर वातावरण तंग झाले होते. स्थानिकांसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मंदिर व वटवृक्ष हटविण्यास तीव्र विरोध करत सरकारचा निषेध केला. मात्र, सोमवारी पहाटेच्या सुमारास मोठ्या पोलिस बंदोबस्तात खाप्रेश्वर देवाची मूर्ती व वटवृक्ष हटविण्यात आला.
सुरुवातीला लोकांचा विरोध पाहून न्यायदंडाधिकारी देवेंद्र प्रभू, उपअधीक्षक विश्वेश कर्पे आणि निरीक्षक राहुल परब यांनी पोलिस फौजफाटा तैनात करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
यावेळी उपस्थितांनी न्यायदंडाधिकारी प्रभू आणि पोलिसांकडे न्यायालयाच्या आदेशाची प्रत दाखवण्याचा आग्रह केला असता केवळ त्यांना तोंडी सांगण्यात आल्यामुळे लोक अधिक संतप्त झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपेश नाईक, शंकर पोळजी, स्वप्नेश शेर्लेकर, अॅड. शैलेश गावस, संजय बर्डे, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर, आम आदमी पक्षाचे समन्वयक अमित पालेकर आणि इतर लोकांनी न्यायालयीन निर्देशाची प्रत दाखवण्याचा वारंवार आग्रह केला असता पोलिसांनी त्याला नकार दिला. यावरून लोक प्रचंड संतप्त झाले.
दरम्यान, सोमवारी (दि. ३) पहाटे ३ ते ४ च्या सुमारास देवाची मूर्ती काढून ती गिरी येथे नेण्यात आली. तर सरकारने मंदिर व वटवृक्षाचे स्थलांतर करण्यासाठी सुकूर-गिरी येथील महामार्गाच्या शेजारी जागा निश्चित केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्थलांतरित वटवृक्षाच्या जागी नूतन खाप्रेश्वर मंदिर बांधून देण्याचे आश्वासन दिले आहे. आमदार मायकल लोबो यांनी घटनास्थळी भेट देऊन सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे.
या प्रकल्पासाठी संमती अटी सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केल्या होत्या, त्यानंतर प्रकल्पाची निविदा प्रक्रिया व अंमलबजावणी करण्यात आली. त्यावेळी आपला यात काहीही सहभाग नव्हता. आता मात्र तो केंद्र सरकारचा प्रकल्प असल्याने, ज्या लोकांनी पूर्वी सहमती दर्शवली होती, तेच आता भूमिका बदलत आहेत. हा केवळ स्थानिक राजकारणाचा भाग आहे. देव खाप्रेश्वर प्रकरणावर मुख्यमंत्री आधीच स्पष्टीकरण देऊन मोकळे झाले आहेत. रविवारी जे घडले ते २०१९ मध्येच ठरवले जाऊ शकले असते. पण आता हेतूपुरस्सर आपल्याला यात बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे म्हणजे राजकीय नाट्य आहे, असेही खंवटे म्हणाले.
कवठणकरांची पोलिस तक्रार
खाप्रेश्वर मंदिर सरकारने पाडल्यानंतर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी पर्वरीचे पोलिस अधिकारी, संयुक्त मामलेदार तसेच उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध खाप्रेश्वर देवाची विटंबना केल्याबद्दल तसेच धार्मिक भावना दुखावल्याबद्दल क्राइम ब्रँच पोलिसांकडे तक्रार केली आहे.
बदनामीचा डाव : खंवटे
पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले, २०१९ ते २०२२ दरम्यान मी विरोधी पक्षात असताना आता आक्षेप घेणारे हेच लोक त्यावेळी संमती अटींना सहमत होते. सरकारी नोंदी तपासा, त्यावर कोणाची स्वाक्षरी आहे ते स्पष्ट होईल. या प्रकल्पासाठी संमती अटी सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केल्या होत्या, त्यानंतर निविदा प्रक्रिया झाली असून यात माझा सहभाग नाही, असेही खंवटे म्हणाले.
रडू कोसळले..
खाप्रेश्वर मंदिर भल्या पहाटे जमीनदोस्त केल्याने आपचे गोवा प्रमुख अॅड. अमित पालेकर यांना भावना अनावर झाल्या. पत्रकार परिषद सुरू असतानाच त्यांना रडू कोसळले. पोलिसांनी मला चौकशीसाठी बोलावले तेव्हा मला भीती वाटली नाही. परंतु आज सरकारने मंदिर पाडून देवाची मूर्ती हलवली तेव्हा मात्र भीती दाटून आली. असहायतेची तीव्रपणे जाणीव झाली.