मी काही वाईट सिनेमाही लिहिले!
By Admin | Updated: November 25, 2014 01:23 IST2014-11-25T01:23:25+5:302014-11-25T01:23:25+5:30
पणजी : मी चांगले सिनेमा केले आहेत; पण मी काही वाईट सिनेमा लिहिले आहेत, असे ‘गँग्स आॅफ वासेपुर’ सिनेमाचे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी सांगितले.

मी काही वाईट सिनेमाही लिहिले!
पणजी : मी चांगले सिनेमा केले आहेत; पण मी काही वाईट सिनेमा लिहिले आहेत, असे ‘गँग्स आॅफ वासेपुर’ सिनेमाचे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी सांगितले.
मी जे काही वाईट सिनेमा लिहिले, त्यांची मी नावे घेत नाही; कारण ते अन्य काही निर्र्मात्यांचे चित्रपट आहेत, असे कश्यप समूह मुलाखतीच्या कार्यक्रमावेळी म्हणाले. मला प्रत्येक वर्षी सिनेमा काढायचा आहे. जर माझे आदल्या वर्षीचे काम यशस्वी ठरले, तर मला दुसऱ्या वर्षी नवे काही करण्यास प्रेरणा मिळते. प्रत्येक सिनेमा तुम्हाला जास्त काही तरी करण्याचे स्वातंत्र्य देतो, असे कश्यप म्हणाले. कश्यप यांनी दिग्दर्शित केलेला ‘बॉम्बे वेल्वेट’ हा सिनेमा येत्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. सिनेमांच्या प्रदर्र्शनासाठी आम्हाला जास्त जागा हवी आहे व केंद्र सरकारने ती उपलब्ध करावी, असेही कश्यप म्हणाले.
प्रादेशिक भाषांमध्ये काही खूप चांगले सिनेमा तयार होत आहेत. हिंदी चित्रपटांपेक्षाही काही तमिळ व मराठी चित्रपट हे चांगले आहेत, असे मला वाटते. मात्र, वितरणाबाबतच्या समस्यांमुळे ते सिनेमा चांगले असूनही जास्त प्रमाणात लोकांसमोर येत नाहीत, अशी खंत कश्यप यांनी व्यक्त केली. सिने निर्माते एकमेकास प्रोत्साहन देत नाहीत. जर एखादा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला नाही, तर लोक इंटरनेटवरून तो डाउनलोड करतात, असेही कश्यप म्हणाले. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा गंभीरपणे घेण्याची गरज आहे. ती स्पर्धा नव्हे तर ते प्रदर्शन आहे, असेही त्यांनी नमूद केले. (खास प्रतिनिधी)