शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहीन: आमदार गोविंद गावडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 12:38 IST2025-09-17T12:37:26+5:302025-09-17T12:38:00+5:30
कोडार-बेतोडा येथील प्रस्तावित आयआयटी क्षेत्रातील कष्टकऱ्यांसोबत चर्चा

शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहीन: आमदार गोविंद गावडे
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : कोडार व बेतोडा येथे जो आयआयटी प्रकल्प प्रस्तावित आहे किंवा त्यासंबंधी हालचाली चालू आहेत त्यावर माझे लक्ष राहील. प्रत्यक्षात खरेच जर तो प्रकल्प साकार झाला आणि कष्टकरी आदिवासी लोकांच्या जमिनी प्रकल्पाच्या घशात जात असतील तर संपूर्ण 'उटा' संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे आश्वासन आमदार गोविंद गावडे यांनी दिले. मंगळवारी त्यांनी कसमशेळ-बेतोडा येथे ग्रामस्थांची भेट घेत भावना समजून घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार गावडे म्हणाले की, जिथे अन्याय तिथे 'उटा' संस्था आहे. कुणाला कधी पाठिंबा द्यायचा याचे ज्ञान उटा संघटनेला आहे. कुणाच्या दावणीला बांधलेली ही संघटना नाही. स्थानिक ग्रामस्थांनी मला लेखी निवेदन दिलेले आहे. त्या निवेदनाच्या आधारे संपूर्ण परिसर मी त्यांच्याबरोबर फिरून पाहीन. नेमके काय आहे व नेमके किती नुकसान होणार आहे याचा सखोल अभ्यास केल्यानंतरच मुख्यमंत्र्यांसमोर हा अभ्यास ठेवणार आहे.
येथे जिथे सरकार आयआयटी प्रकल्प आणू पहात आहे ती संपूर्ण जागा हे शेतकऱ्यांची आहे. मुख्य म्हणजे या शेती बागायती आदिवासी समाजाने आपले रक्त आटवून उभ्या केल्या आहेत. परंतु बहुतांश जागेत रानटी जनावरांसाठी व पाळीव पशुपक्षांसाठी चारा व इतर पालापाचोळा या डोंगरमाथ्यावर तयार होतो. साहजिकच ज्यावेळी आयआयटी सारख्या प्रकल्पामुळे त्यांच्या शेतावर नांगर फिरणार असेल तर ते आवाज काढणारच. वेळ आल्यावर त्या लोकांचा आवाज नक्कीच बनेन. आणि तेच सागण्यासाठी मी येथे आलो आहे, असेही आमदार गावडे म्हणाले.
सलग जमीन मिळणे कठीण
आमदार गावडे म्हणाले, खरे तर ज्यावेळी मी पहिल्यांदा आमदार झाल्यावर त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आयआयटीचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला होता. त्यावेळेसच मी त्यांना बारा लाख चौरस मीटर जमीन ऐवजी सात लाख चौरस मीटर जमीन संपादन करण्याचा पर्याय दिला होता. कारण बारा लाख चौरस मीटर जमीन सलगपणे गोव्यात मिळणे कशी अवघड आहे त्यांना समजावून सांगितले होते.