कोणाचेही कंत्राट मी रद्द करणार नाही, पण 'माध्यान्ह'चा दर्जा सुधारा; मुख्यमंत्र्यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 08:02 IST2025-03-18T08:01:09+5:302025-03-18T08:02:16+5:30
'अक्षय पात्र'च्या गोव्यातील पहिल्या हायटेक किचनचे पिळर्ण येथे उद्घाटन

कोणाचेही कंत्राट मी रद्द करणार नाही, पण 'माध्यान्ह'चा दर्जा सुधारा; मुख्यमंत्र्यांचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'कोणत्याही सेल्फ हेल्प ग्रुपचे माध्यान्ह आहार कंत्राट रद्द करणार नाही. परंतु आहाराचा दर्जा सुधारावाच लागेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. पिळर्ण येथे 'अक्षय पात्र'च्या गोव्यातील पहिल्या आणि देशभरातील ७८ व्या हायटेक किचनचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
या प्रसंगी साळगावचे आमदार केदार नाईक, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, उत्तर गोवा जिल्हाधिकारी डॉ. स्नेहा गित्ते यांच्यासह अक्षय पात्रचे सह-संस्थापक आणि उपाध्यक्ष चंचलपती दास, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) च्या वतीने सीएसआरचे वरिष्ठ प्रमुख सुभाष चंद्र राय, अक्षय पात्रचे सीईओ श्रीधर वेंकट उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, अक्षय पात्र राज्य सरकारसोबत दीर्घकाळ काम करणार आहे. मुलांना चांगला व दर्जेदार आहार मिळावा यासाठी माझे सरकार कटिबद्ध आहे. पहिली ते दहावीपर्यंत माध्यान्ह आहाराची सोय केली आहे. शालेय पोषण क्षेत्रातील गोवा सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी अक्षय पात्र राज्यातील लाभार्थी मुलांना ताजे शिजवलेले, स्वच्छ आणि पौष्टिक माध्यान्ह भोजन देईल.
या स्वयंपाकगृहासाठी गोवा सरकारने १५,००० चौरस फूट जागा उपलब्ध करून दिली आहे. ५,००० मुलांसाठी येथे माध्यान्ह आहार शिजवून वितरित करण्याची क्षमता आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने आवश्यक स्वयंपाकघर पायाभूत सुविधांसह मदत केली आहे. अक्षय पात्र संस्था सुरुवातीला भारत सरकारच्या प्रमुख शालेय आहार कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान पोषण अभियानाचा भाग म्हणून राज्यातील २,५०० मुलांना आहार देईल.
सावंत म्हणाले की, दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या पुण्यतिथीदिनी मुलांना पौष्टिक माध्यान्ह भोजन देण्याचे त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरताना पाहून मला खूप आनंद होत आहे. जवळजवळ एक दशकापूर्वी 'अक्षय पात्र'ला गोव्यात आमंत्रित करण्यासाठी पर्रीकर यांनीच पुढाकार घेतला होता आणि २०१३-१४ मध्ये सुरू झालेल्या प्रयत्नांना आज यश आले आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, या वर्षापासून आम्ही इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनाही माध्यान्ह आहार देत आहोत. साळगाव, कळंगुट आणि शिवोली मतदारसंघातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. पंतप्रधान पोषण अभियानांतर्गत हा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत.
१६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशात अक्षयपात्रचे जाळे
अक्षयपात्र फाउंडेशनचे सह-संस्थापक आणि उपाध्यक्ष चंचलपती दास म्हणाले की, अक्षय पात्रने २००० मध्ये स्थापनेपासून खूप मोठा पल्ला गाठला आहे. या वर्षी फाउंडेशनच्या सेवेची २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या स्वयंपाकघराच्या उद्घाटनासह, अक्षय पात्राच्या केंद्रीकृत स्वयंपाकघरांचे नेटवर्क आता १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरले आहे. स्थानिक चव आणि अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता मानकांचे पालन करून गोव्यातील मुलांना पौष्टिक आणि स्वच्छ माध्यान्ह आहार देण्यासाठी फाउंडेशन वचनबद्ध आहे.
मुलांसाठी मेन्यू
अक्षय पात्र देशभरातील स्थानिक चवीनुसार अन्न पुरवते. गोव्यात मेनूमध्ये चपाती, बटाटा भाजी, वाटाणा भाजी, कुर्मा भाजी, इडली- सांबार, सोया चंक्स, मिक्स-व्हेज पुलाव इत्यादी पदार्थांचा समावेश असेल.
५००० हजार मुलांना लाभ
एनपीसीआयचे प्रवक्ते म्हणाले, अक्षयपात्रमुळे गोव्यातील ५००० शालेय मुलांसाठी माध्यान्ह भोजन उपलब्ध होईल. मुलांच्या आरोग्याला आणि सर्वांगीण विकासाला हातभार लागेल. या उदात्त उपक्रमाला चालना देण्यासाठी गोवा सरकार आणि अक्षयपात्र फाउंडेशनच्या प्रयत्नांचे आम्ही मनापासून कौतुक करतो.
७८ देशात स्वयंपाकघरे तांदूळ शिजवण्याच्या ६०० लिटर क्षमतेच्या कढईत ६० मिनिटांत १,२५० जणांचे जेवण तयार करते.
डाळीच्या ६०० लिटर क्षमतेच्या कढईत २० मिनिटांत २००० जणांचे जेवण सुनिश्चित करते. इडली दर तासाला इडली स्टीमरद्वारे तयार करता येतात.
निमस्वयंचलित चपाती मशीन: तासाला २००० चपात्या बनवते. यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत आणि चांगले जेवण पुरवण्यात येणार आहे.