मी कोणाला घाबरत नाही: जीत आरोलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2025 13:22 IST2025-02-06T13:21:43+5:302025-02-06T13:22:26+5:30
लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या भाजपप्रवेश संकेतावर केले भाष्य

मी कोणाला घाबरत नाही: जीत आरोलकर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिलेल्या भाजपप्रवेशाच्या संकेतावर मांद्रेचे मगोपचे आमदार जीत आरोलकर यांनी 'कोणी आले म्हणून मी घाबरत नाही', अशी प्रतिक्रिया दिली आहे.
पार्सेकर भाजपात आल्यास व पक्षाने त्यांना तिकीट दिल्यास सरकारात मित्र पक्षाचे असूनही तुम्ही त्यांच्याविरुद्ध लढणार का? असे विचारले असता जीत म्हणाले की, अशी वेळ येईल तेव्हा पाहू. पण कोणी आले म्हणून मी घाबरत नाही. पार्सेकर सध्या राजकारणात सक्रिय असोत किंवा नसोत, परंतु ते ज्येष्ठ राजकारणी आहेत. मी त्यांचा आदर करतो. ते परिपक्व आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णयाबद्दल मला काहीच बोलायचे नाहीय' असे आमदार आरोलकर यांनी स्पष्ट केले.
दामू नाईक प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून पार्सेकर यांची त्यांच्याशी जवळीक वाढली आहे. भाजपने दामू यांची या पदावर केलेली निवड योग्यच असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती. या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी मंगळवारी लक्ष्मीकांत पार्सेकर यांना विचारले असता ते असे म्हणाले होते की, मी भाजप पक्ष सोडला तरी त्यानंतर अन्य कुठल्याही पक्षात गेलेलो नाही. माझ्याविषयी काय निर्णय घ्यायचा तो जे कोणी भाजप पक्ष चालवतात तेच घेतील.
दरम्यान, आमदार मायकल लोबो मांद्रे मतदारसंघात निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. त्यांनी तशा हालचाली मध्यंतरी चालवल्या होत्या. सूचक विधाने केली होती. या विषयावर पत्रकारांनी विचारले असता याबाबत प्रसारमाध्यमेच पराचा कावळा करत असल्याचा आरोप आमदार आरोलकर यांनी केला. ते म्हणाले की, मायकल लोबो हे माझे चांगले मित्र आहेत. पुढील निवडणुकीत कदाचित ते माझ्या पाठीशीही असू शकतील.