औषध तुटवड्याची हायकोर्टाकडून दखल
By Admin | Updated: January 7, 2015 01:27 IST2015-01-07T01:21:54+5:302015-01-07T01:27:48+5:30
गोमेकॉतील प्रकार : स्पष्टीकरणास दोन आठवड्यांची मुदत

औषध तुटवड्याची हायकोर्टाकडून दखल
पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयात निर्माण झालेल्या औषधांच्या तुटवड्याची मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने दखल घेतली आहे. या संबंधीच्या एका जुन्या याचिकेला जोडून न्यायालयाने वृत्तपत्रातील वृत्तांताच्या आधारे नव्याने याचिका दाखल करून घेतली आहे.
गोमेकॉच्या औषधालयात औषधांचा तुटवडा असल्यामुळे रुग्णांना खासगी औषधालयातून औषधे घ्यावी लागत आहेत. गरिबांना त्यामुळे त्रास होत आहे. औषधांचा तुटवडा कशासाठी होत आहे आणि सरकारने यावर काय उपाययोजना केली आहे, याचे स्पष्टीकरण दोन आठवड्यांत देण्यात यावे, असे न्यायाधीश एफ. एम. रेईश आणि के. एल. वदने यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.
गोमेकॉतील सोयीसुविधांवर अंगुलीनिर्देश करणारी याचिका २००७ साली प्रकाश सरदेसाई यांनी दाखल केली होती. या याचिकेवर अजूनही सुनावणी सुरू आहे. नव्याने घेण्यात आलेली स्वेच्छा याचिका याच याचिकेला जोडण्यात
आली आहे. (प्रतिनिधी)