लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : शिरगाव येथे शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या चौकशी समितीने सायंकाळी शिरगावला भेट देऊन विविध ठिकाणी पाहणी केली. तसेच वेगवेगळ्या प्रतिनिधींसमवेत विशेष बैठक घेऊन तपासकाम सुरू केले आहे. कमिटीचे अध्यक्ष संदीप जॅकिस, खासदार सदानंद तानावडे, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट, वरिष्ठ पोलिस अधिकारी वर्षा शर्मा व इतर अधिकारी पोलिस टीम, उपजिल्हाधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर विविध प्रतिनिधींनी माहिती गोळा केली. तसेच शिरगाव मंदिराच्या सभागृहात उच्चस्तरीय बैठक झाली. त्या बैठकीत वरील सर्व पदाधिकारी, देवस्थान समितीचे पदाधिकारी व इतर काही ग्रामस्थ उपस्थित होते. बैठकीत नेमकी घटना कशी घडली, याबाबत विचारमंथन करण्यात आले.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना संदीप जॅकिस म्हणाले, आमच्या समितीकडून घटनेची सखोल चौकशी करीत आहे. सर्व बाजूने पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. लवकरच सत्य बाहेर येईल, तोपर्यंत भाविकांनी संयम बाळगावा, असेही ते म्हणाले.
मृतांना देवस्थानकडून श्रद्धांजली
शिरगाव येथील लईराई संस्थान समितीतर्फे शनिवारी पहाटे घडलेल्या दुर्घटनेत मृत पावलेल्या सहाजणांना देवस्थान समितीतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी असून, त्याबद्दल आम्हाला तीव्र दुःख आहे. ज्यांना प्राण गमवावे लागले, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी प्रार्थना आम्ही करतो, असे देवस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी सांगितले. हे दुःख पचविण्याची शक्ती त्यांना परमेश्वर देवो, अशी संवेदना देवस्थान समितीने व्यक्त केली आहे.
दोन दिवसांत अहवाल
चेंगराचेंगरीचे तपासकाम व निष्कर्ष काढायला एक-दोन दिवस लागतील. आमचे काम सुरू असून, सर्व बाजूंनी चौकशी करून घटनाक्रम व नेमकी घटना कशी घडली, याचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे जॅकिस यांनी सांगितले.