घरांच्या किमती दहा टक्क्यांनी कमी होणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 09:48 IST2025-09-05T09:48:35+5:302025-09-05T09:48:35+5:30
जीएसटी सुधारणांनी सर्वसामान्यांना दिला मोठा दिलासा; खोल्यांचे भाडे कमी झाल्याने पर्यटकांची संख्याही वाढणार

घरांच्या किमती दहा टक्क्यांनी कमी होणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :जीएसटी दर सुधारणांचे स्वागत करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे म्हटले आहे. घरांच्या किंमती १० टक्क्यांनी कमी होणार, पंचतारांकित हॉटेलांच्या खोल्यांच्या भाड्यावरील जीएसटी कमी झाल्याने पर्यटकसंख्या वाढणार, तसेच औषधे, वैद्यकीय उपकरणे स्वस्त होणार असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गोव्यातील शेतकरी वर्ग तसेच इतरांना या सुधारणांचे लक्षणीय फायदे होतील. कृषी, पर्यटन आणि खाण क्षेत्रांनाही फायदा होण्याची अपेक्षा आहे. जीएसटी सुधारणांमुळे प्रमुख क्षेत्रे बळकट होतील, सामान्य माणसाला दिलासा मिळेल. जीएसटी कमी झाल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वगैरे खरेदी करता येतील. वस्त्रोद्योग, आरोग्यसेवा, ऑटोमोबाइल, अक्षय ऊर्जा, शिक्षण, विमा, गृहनिर्माण आणि पनीर, दूध आणि मीठ यासारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंना लक्षणीय चालना मिळेल. आत्मनिर्भर भारत निर्माण होण्यास आणि स्वयंपूर्ण गोवा साध्य करण्यास याचा हातभार लागेल.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात करदात्यांची संख्या गेल्या आठ वर्षांत ११२ टक्क्यांनी वाढली आहे. २०१७ च्या तुलनेत २५,०३५ करदाते वाढले व ही संख्या आज ४७,२३२ झाली आहे. २०१८-१९ च्या तुलनेत जीएसटी महसूलही ७४ टक्क्यांनी वाढला आहे. नवीन जीएसटी सुधारणांअंतर्गत, नोंदणी तीन दिवसांत पूर्ण केली जाईल, तर निर्यातदार आणि इतरांसाठी परतफेड सात दिवसांत केली जाईल. एक राष्ट्र, एक कर प्रणाली संकल्पनेंतर्गत जीएसटीवर जवळजवळ ८५ टक्के व्यावसायिक समाधानी आहेत.
राज्यात कर संकलन वाढेल, असा दावा सावंत यांनी केला. ते म्हणाले की, गेल्या तेरा वर्षांच्या काळात मोदींनी गरिबांना दारिद्र्य रेषेवर आणले. विकसित भारत २०४७ स्वप्न साकार करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. पंचतारांकित हॉटेलांमधील ७५०० रुपयांपेक्षा कमी भाडे असलेल्या खोल्यांवरील जीएसटी कमी करून ५ टक्क्यांवर आणला त्यामुळे पर्यटक वाढतील.
सिमेंटवर १८% जीएसटी
सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून दूध पनीर, चॉकलेट यावरील जीएसटी ० ते ५ टक्के एवढाच ठेवला. पेन्सिल, खोडरबरवरील जीएसटी काढला. सिमेंटवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून कमी करून १८ टक्क्यांवर आणला. घराच्या किमती १० टक्क्यांनी कमी होणार त्यामुळे सर्वसामान्य माणूस आता घर खरेदी करू शकणार, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कर्करोग तसेच अन्य दुर्धर रोगांवरील औषधांचा जीएसटी काढून टाकला. निदान करणाऱ्या वैद्यकीय उपकरणांवर जीएसटी कमी केला. आरोग्य विम्यावरील जीएसटी काढला. - प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.