सप्टेंबरपासून नोकरभरती; कर्मचारी आयोगाला १ ऑगस्टपर्यंत देणार रिक्त जागांची यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 11:07 IST2023-06-02T11:05:48+5:302023-06-02T11:07:03+5:30

कर्मचारी भरती आयोगाच्या वेबसाईटचे अनावरण करताना ते बोलत होते.

hiring from september list of vacancies to be given to the staff commission by august 1 | सप्टेंबरपासून नोकरभरती; कर्मचारी आयोगाला १ ऑगस्टपर्यंत देणार रिक्त जागांची यादी

सप्टेंबरपासून नोकरभरती; कर्मचारी आयोगाला १ ऑगस्टपर्यंत देणार रिक्त जागांची यादी

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : सर्व सरकारी खात्यातील रिक्त पदांची माहिती सरकारकडून १ ऑगस्टपर्यंत कर्मचारी भरती आयोगाकडे सोपविली जाईल. यापुढे लोकसेवा आयोगाव्यतिरिक्त सर्व पदेही कर्मचारी भरती आयोगामार्फतच भरली जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली.

गुरुवारी कर्मचारी भरती आयोगाच्या वेबसाईटचे अनावरण करताना ते बोलत होते. विविध सरकारी खात्यांत खूप पदे रिक्त असून त्या सर्व पदांची माहिती आयोगाकडे सोपवली जाणार आहे. काही काळाने जी आणखी पदे रिक्त होतील, अशा पदांची माहितीही आयोगाला १ ऑगस्टपर्यंत पुरविली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले. 

'कर्मचारी भरती आयोगाला भरती प्रक्रिया १ ऑगस्टनंतर सुरू करणे शक्य होईल आणि सप्टेंबर महिन्यात परीक्षा घ्यायला मिळेल, अशा पद्धतीने आयोगाला डेटा पुरविण्याचे काम जलदगतीने केले जाईल' असेही मुख्यमंत्री म्हणाले. परीक्षा वर्षातून एकदाच घेतली जाईल. या काळात भरतीसाठी जाहिराती आल्या तर प्रतीक्षा यादीत असलेल्या उमेदवारांना त्यात संधी दिली जाईल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

केवळ सरकारी खात्यातीलच नव्हेत तर इतर काही संस्थांच्या भरतीसाठीही आयोग परीक्षा घेऊ शकेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गोवा शिपयार्डने नोकरभरतीसाठी तशी विनंती केली होती. गोवा विद्यापीठ आणि इतर स्वायत्त संस्थांनीही तशी इच्छा व्यक्त केल्यास भरती प्रक्रियेत आयोग सहभागी होवू शकेल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.

लेखी परीक्षेतही वशिलेबाजी करून नोकरभरती केल्याचे आरोप मागील काही नोकर भरतीच्या प्रक्रियेवेळी विरोधकांकडून करण्यात आले होते. परंतु यापुढे अशा आरोपांना जागाच असणार नाही. कारण या परीक्षा कम्प्युटर बेस्ड रिक्रूटमेंट टेस्ट पद्धतीने होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यासाठी माहिती तंत्रज्ञान खात्याची मदत घेतली जाणार आहे.

३१ ऑगस्टची डेडलाईन

सद्यस्थितीत सरकारच्या विविध खात्यांकडून हाती घेण्यात आलेल्या नोकर भरतीची प्रक्रिया त्या त्या खात्यांकडून पूर्ण करण्यास ३१ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. सर्व संबंधित खात्यांची ही प्रक्रिया मुदतीत पूर्ण करावी. जर ३१ ऑगस्टपर्यंत प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर त्यानंतर ती प्रक्रिया कर्मचारी भरती आयोगामार्फत केली जाईल. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे दूरदर्शनवर 'हॅलो गोंयकार'

राज्यातील जनतेशी थेट संवाद साधण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून मुख्यमंत्री सावंत 'हॅलो गोंयकार' या विशेष थेट फोन-इन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पणजी दूरदर्शन केंद्राने गोवा सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला हा अनोखा उपक्रम नागरिकांना त्यांच्या समस्या आणि तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग प्रदान करणार आहे. कार्यक्रमाचा पहिला भाग शुक्रवारी होणार आहे. त्याचे सायंकाळी ७ वाजता पुनःप्रसारण होणार आहे. मुख्यमंत्री प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी 'हॅलो गोंयकारा मध्ये सहभागी होतील. या विशेष फोन इन कार्यक्रमादरम्यान दर्शक मुख्यमंत्री सावंत यांच्याशी २२२२४२४ आणि २२२५२०४ या दूरध्वनी क्रमांकांवरून संपर्क साधू शकतील आणि आपल्या समस्या मांडू शकतील.

वेबसाईटचे लोकार्पण

- कर्मचारी भरती आयोगाच्या अधिकृत वेबसाईटचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

- ही वेबसाईट इंग्रजी, कोकणी आणि मराठी अशा तीन भाषांत आहे. शिवाय ती दिव्यांगांसाठीही सोयीस्कर आहे.

- विविध ठिकाणी असलेल्या नागरी सहाय्यता केंद्रातही ती लोकांसाठी वापरण्याची सोय करून दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

Web Title: hiring from september list of vacancies to be given to the staff commission by august 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.