दुचाकीवर दोघांनाही हेल्मेटसक्ती
By Admin | Updated: August 1, 2014 01:48 IST2014-08-01T01:44:47+5:302014-08-01T01:48:25+5:30
पणजी : दुचाकीवर मागे बसणाऱ्यांनाही हेल्मेटसक्तीची कडक अंमलबजावणी केली जाईल, असे वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेत स्पष्ट केले.

दुचाकीवर दोघांनाही हेल्मेटसक्ती
पणजी : दुचाकीवर मागे बसणाऱ्यांनाही हेल्मेटसक्तीची कडक अंमलबजावणी केली जाईल, असे वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेत स्पष्ट केले. रेल्वे जाळे विस्तारून मडगाव-फोंडा, थिवी-वाळपई व सावर्डे-फोंडा असे नवीन रेल्वेमार्ग तयार करून स्थानिक वाहतुकीचा प्रस्ताव असल्याची माहितीही त्यांनी दिली.
वाहतूक खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. मोटर वाहन कायद्यात दुचाकीवर मागे बसणाऱ्याला हेल्मेट सक्तीचे आहे. फक्त या कायद्याची अंमलबजावणी होत नव्हती, ती आता कडकपणे होणार आहे.
म्हापसा, पेडणे, माशेल येथे नवी बसस्थानके, फोंडा येथे ट्रक टर्मिनल येणार असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले. मडगाव शहराचा वाहतूक आराखडा चतुर्थीनंतर निश्चित होईल आणि डिसेंबर-जानेवारीपासून कामे सुरू होतील, वाहन चालविण्याच्या प्रशिक्षणासाठी फोंड्यानजीक ड्रायव्हिंग ट्रॅकही येईल, असे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांनी कपात सूचना मांडताना वाढत्या अपघातांकडे लक्ष वेधले. दुचाक्यांवर मागे बसणाऱ्यांनाही हेल्मेट सक्तीचे करावे, अशी मागणी त्यांनी केली. ते म्हणाले, अनेक युवकांचे अपघातांमध्ये बळी जात आहेत. थरारक स्टंट केले जातात. अशा युवकांवर नजर ठेवायला हवी. रस्ते ट्रॅफिक उजव्या बाजूला व फास्ट ट्रॅफिक डाव्या बाजूला अशी व्यवस्था केल्यास अपघात टळू शकतात, असे ते म्हणाले.
नव्या जुवारी पुलाची नितांत गरज असून तो लवकरात लवकर बांधावा. जुन्या पुलावर अवजड वाहनांची बंदी काटेकोरपणे पाळावी, असे ते म्हणाले.
आमदार दिगंबर कामत यांनी वाहनसंख्या १० लाखांवर पोचल्याने आणखी अपघातांचे प्रमाण वाढले आहे याकडे लक्ष वेधले. काळ््या काचांच्या वाहनांवर कारवाई होत नाही. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जागृती घडवून आणली जात नाही, असे ते म्हणाले.
आमदार मायकल लोबो यांनी टुरिस्ट टॅक्सीचालकांचा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या मागण्यांकडे सहानुभूतीपूर्वक लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. आरटीओ अधिकाऱ्यांनी पर्यटक वाहने अढवून त्यांना त्रास करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार माविन गुदिन्हो यांनी अपघातांचा विषय उपस्थित करून चालकाच्या चुकीमुळे अपघातात एखाद्याचा मृत्य ओढवलेला असल्यास तीन वर्षांसाठी वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करावा, अशी मागणी केली. (प्रतिनिधी)