नवभारत निर्माणात हेडगेवार यांचे मोठे योगदान: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 13:02 IST2025-09-20T13:01:42+5:302025-09-20T13:02:19+5:30
साखळीत आयोजित 'युगप्रवर्तक' नाटकाला प्रतिसाद : नादब्रह्म संस्था नागपूरची निर्मिती

नवभारत निर्माणात हेडगेवार यांचे मोठे योगदान: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : नवभारत निर्माणासाठी डॉ. के. ब. हेडगेवार यांचे योगदान हे सदैव प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचे संस्कार आपल्या आजच्या पिढीवर व्हायला हवेत. त्यांचा जीवनपट व कार्य 'युगप्रवर्तक' नाटकातून समोर येणार आहे. त्यांच्या सेवा, समर्पण व त्याग या तीन मंत्रांची स्मृती सदैव स्मरणात ठेऊन त्याप्रमाणे आपले जीवन पुढे नेण्यासाठी झटावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी रवींद्र भवन येथे केले.
साखळी रवींद्र भवनात कला व संस्कृती खाते आयोजित नादब्रह्म संस्था नागपूर निर्मित डॉ. के.ब. हेडगेवार यांच्या कार्यावर आधारित नाटकाच्या शुभारंभी मुख्यमंत्री सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, साखळीच्या नगराध्यक्षा सिध्दी प्रभू, डिचोलीचे नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, कला व संस्कृती खात्याचे संचालक विवेक नाईक उपस्थित होते.
डॉ. हेडगेवार यांनी या राष्ट्र निर्मितीसाठी राष्ट्रीय स्वयं सेवक संघाची स्थापना करून देशभरात पेटविलेली देशप्रेमाची ज्योत आजही तेवत आहे. त्यांनी देशासमोर पेटविलेली क्रांतीची मशाल आजच्या युवा पिढीने पुढे नेण्याची गरज आहे. असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले. या नाट्यप्रयोगासाठी साखळी परिसरातील नाट्यप्रेमी नागरिक आणि विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घोषणांनी सभागृह दणाणले
'युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार' या नाटकासाठी संपूर्ण सभागृह रसिक प्रेक्षकांनी भरले होते. सभागृहाबाहेर रवींद्र भवनच्या आतील खुल्या जागेत खास एलईडी स्क्रीन लावून रसिकांसाठी सोय करण्यात आली होती. तेथेही लोकांची गर्दी होती. नाटकाच्या प्रत्येक प्रसंगावेळी 'भारत माता की जय' 'वंदे मातरम' या घोषणांनी रवींद्र भवनचा सभागृह दणाणून सोडले. कला व संस्कृती खात्याचे संचालक विवेक नाईक यांनी स्वागत केले.