मुसळधार पावसाने गोव्यात पडझडीच्या घटना सुरूच; पुढील तीन दिवस राज्यात ऑरेंज अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 16:01 IST2024-07-22T16:00:41+5:302024-07-22T16:01:36+5:30
झाडे पडून गाड्यांचे नुकसान झाले. तसेच लोकांच्या घरात पुराचे पाणी शिरुन नुकसान झाले आहे.

मुसळधार पावसाने गोव्यात पडझडीच्या घटना सुरूच; पुढील तीन दिवस राज्यात ऑरेंज अलर्ट
नारायण गावस, पणजी: राज्यात पावसाचा मारा सुरुच असून गेल्या आठवड्याभरात माेठ्या प्रमाणात पडझडीच्या घटना समाेर आल्या आहेत. सोमवारीही जाेरदार पावसाने गोवा विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे छत काेसळले त्याच प्रमाणे मडगावात अँथनी रॉड्रिग्ज यांचे घर कोसळले. बांदाेडा येथे घरावर माड काेसळून मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांनी आता उपजिल्हाधिकाऱ्यांना धोकादायक झाडे ताेडण्याचे आदेश दिले आहेत.
पडझडीने मोठी वित्तहानी
गेला महिन्याभरात राज्यात पाऊस सुरुच असून माेठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. तसेच या पावसाने ७ जणांचा आतापर्यंत बळी घेतला आहे. अग्निशमन दलाने जुलै महिन्यात ११०० हून अधिक पडझडीच्या घटनांची नाेंद केली. तसेच गेल्या आठवड्याभरात ३०० हून अधिक वीज खांब काेसळे आहेत. या पडझडीमुळे लोकांची लाखो रुपयाची हानी झाली तसेच अनेक गाड्यावर झाडे पडून गाड्यांचे नुकसान झाले. तसेच लोकांच्या घरात पुराचे पाणी शिरुन नुकसान झाले आहे.
पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट
राज्यात अजूनही पावसाचा जाेर कायम आहे. २४ जुलैपर्यंत हवामान खात्याने राज्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढणार आहे. आतापर्यंत राज्यात १०२.९ इंच पाऊस झाला आहे. तर गेल्या २४ तासात १.६ इंच पाऊस झालेला आहे. जून पेक्षा जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस यंदा झाला आहे. त्याचप्रमाणे धरणे नद्या यांची पातळी भरली. अनेक धरणांचे पाणी साेडण्यातही आले आहे.