गडगडाटासह जोरदार पाऊस; अनेकांची तारांबळ, झाडे पडून वाहतूक विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2024 11:57 IST2024-05-15T11:57:05+5:302024-05-15T11:57:19+5:30
अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

गडगडाटासह जोरदार पाऊस; अनेकांची तारांबळ, झाडे पडून वाहतूक विस्कळीत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यातील विविध भागात मंगळवारी सायंकाळी पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. अनेक भागात मोठ्या गडगडाटासह विजांचा लखलखाटही झाला. काही भागात पडझड झाली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
सत्तरीच्या अनेक ठिकाणी मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यात पडझड झाली आहे. विजेच्या लखलखाटसह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कणकीरे येथे रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. ग्रामीण भागात वीजपुरवठा ठप्प झाला होता. सत्तरीत गेले चार दिवस वादळी पाऊस हजेरी लावत आहे.
मंगळवारी दिवसभर प्रचंड गर्मी होत होती. त्यामुळे पाऊस येईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. दिवसभर ढगाळ वातावरण होते. संध्याकाळी पावसाला सुरुवात झाली. सत्तरीतील अनेक भागात वीजपुरवठा ठप्प झाला आहे. सत्तरीत गेले चार दिवस वादळी पाऊस लागला.
डिचोली तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडून अनेक ठिकाणी पडझड झाल्याच्या घटना घडल्या. शिरगाव येथे देवी लईराईचा उत्सव सुरू असून मुसळधार पावसामुळे दुकानदार तसेच भाविकांची बरीच तारांबळ उडाली. या ठिकाणी रात्री भाविकांची गर्दी झाली होती, परंतु पावसामुळे फेरीवर परिणाम दिसून आला.
अनेक भागात चिखल
डिचोली अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, तळेपाळी, मये रेल्वे गेट, तसेच कारापूर या ठिकाणी आंब्याची तसेच फणसचे वृक्ष पडून नुकसान झाले. रस्त्यावर झाड पडल्याने ती हटविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान कार्यरत झाले आहेत पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. अनेक ठिकाणी रस्ते खोदून भूमिगत वीज वाहिन्या, गटाराची कामे सुरू असून अशा ठिकाणी पावसामुळे चिखल झाला होता.
काळा आला होता, पण...
सत्तरी तालुक्याच्या मामलेदार कार्यालयाच्या नजीक असलेल्या गुलमोहराचे झाड पडून तीन मोटारसायकल व एक कार मिळून चार वाहनांचे नुकसान होण्याचा प्रकार मंगळवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडला. ज्यावेळी हे झाड पडले, त्यावेळी एक जोडपे त्या ठिकाणाहून चालत जात होते. अचानक झाड पडल्याने ते दोघे मध्येच अडकून पडले. मात्र, अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वीज पुरवठा बंद केला. त्यानंतर त्या जोडप्याला मुखरूप बाहेर करण्यात आले. एक चारचाकी व तीन दुचाकी वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशामक दलाच्या जवानांकडून प्राप्त झाली आहे. दुपारी १२:२८ वाजण्याच्या सुमारास हा घटना घडली. त्यानंतर सव्वाएक वाजेपर्यंत वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांनी ते झाड बाजूला केले.