राज्यात उष्णतेची लाट? सोमवारपासून तापमान ३५ अंश सेल्सियसवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2024 15:10 IST2024-04-14T15:09:48+5:302024-04-14T15:10:50+5:30
यंदा मार्च महिन्यापासून उष्णतेचा पारा ३३ ते ३४ अंश पर्यंत गेला होता.

राज्यात उष्णतेची लाट? सोमवारपासून तापमान ३५ अंश सेल्सियसवर
नारायण गावस, पणजी: राज्यात उष्णतेचा पारा वाढला असल्याने या उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. उद्या साेमवार १५ एप्रिलपासून उष्णतेचा पारा ३५ अंश सेल्सियसवर जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे आता नागरिकांनाही या उष्णतेपासू्न बचाव करण्यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे.
यंदा मार्च महिन्यापासून उष्णतेचा पारा ३३ ते ३४ अंश पर्यंत गेला होता. गेले आठ दिवस उष्णतेत वाढ झालेली आहे. आता यंदाचा एप्रिल महिना हा उष्णतेची लाट घेऊन येणार असल्याचे अगोदरच हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. यासाठी आरोग्य खात्याने तसेच हवामान खात्याने नागरिकांना उष्णतेपासून काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन तत्वे जारी केली आहेत. या उष्णतेच्या लाटेची उद्यापासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने उद्या सोमवारपासून तापमान ३५ अंश सेल्सियसवर जाण्याची शक्यता वर्तविली आहे.
शनिवारी दक्षिण गोव्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. पण नंतर कर्नाटकच्या बाजूने सरकल्यानेे आता पावसाचा शक्यता नाही. त्यामुळे आता उष्णतेचा पारा आणखी वाढणार आहे. लोक या उष्णेतच्या बचावासाठी पावसाची वाट पाहत आहेत. गेल्या वर्षीही मधोमध अवकाळी पावसाच्या सरी पडत होत्या. पण यंदा नोव्हेबरपासून पाऊस गेल्यावर अजून तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे उष्णतेत वाढ होत आहे.
या आठवड्यात काही प्रमाणात उष्णतेत वाढ होण्याची शक्यता आहे. काल राज्यात कमाल तापमान ३४ अंशाच्या आसपास होते. ते आता उद्यापासून काही प्रमाणात वाढून ३५ अंश पर्यंत जाण्याची शक्यता असल्याने लोकांनी या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी. सध्या तरी राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता नाही पण तापमानात वाढ होणार असे गोवा वेधशाळेचे संचालक नहूष कुलकर्णी यांनी सांगितले.